नीट पेपरफुटी, आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज आणि राम मंदिर देणगी अपहार यासह विविध मुद्यांवरुन विरोधकांनी सरकारला पावसाळी अधिवेशनाच्या सुरुवातीपासूनच धारेवर धरले.
राज्यसभा आणि लोकसभा या संसदेच्या दोन्ही सभागृहात विरोधक आक्रमक भूमिका कायम ठेवल्याने सभागृहाचे कामकाज होत नाहीये. अशात केंद्र सरकार डिलिमीटेशन आणि महिला आरक्षण सुधारणा विधेयक पुन्हा एकदा संसदेत मांडण्याची शक्यता आहे. यासह सरकारने काँग्रेससह विरोधी पक्षांसमोर तीन दिवसीय विशेष अधिवेशनाचा प्रस्ताव ठेवल्याची माहिती समोर आली आहे.
सरकार विशेष अधिवेशन बोलविण्याच्या तयारीत
सरकार १६,१७ आणि १८ तारखेला विशेष अधिवेशन बोलविण्याची तयारी करत आहे. याबाबत त्यांनी काँग्रेसला कल्पना दिल्याचे वृत्त एनडीटीव्ही आणि इंडिया टुडेने सुत्रांच्या हवाल्याने प्रसिद्ध केले आहे. काँग्रेसने विशेष अधिवेशनाबाबतचे मत पक्षातील इतर सहकारी आणि इतर विरोधी पक्षांशी चर्चा करुन कळवणार असल्याचे या वृत्तात पुढे म्हटले आहे. एप्रिलमध्ये झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सरकारने मतदारसंघ पुनर्रचना आणि महिला आरक्षण सुधारणा विधेयक मांडले होते. मात्र, विधेयकासाठी आवश्यक दोन तृतीयांश मतं न मिळाल्याने हे विधेयक नामंजूर झाले.
एप्रिलमध्ये विधेयक नामंजूर झाल्यानंतर पुन्हा प्रयत्न
एप्रिलच्या अधिवेशनात मांडलेल्या या विधेयकासाठी मतदान झाले त्यावेळी सभागृहात ५२८ सदस्य उपस्थित होते. विधेयक मंजूर होण्यासाठी दोन तृतीयांश म्हणजेच ३५२ मतांची आवश्यकता होती, पण यावेळी मतदानाच्या बाजूने २९८ मतं पडली तर विधेयकाच्या विरोधात २३० मते पडली. यामुळे विधेयक संसदेत मंजूर होऊ शकले नाही. दरम्यान, सरकार पुन्हा हे विधेयक घेऊन येण्याचा विचार करत आहे. तृणमूल काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत फूट पडल्यानंतर विधेयकासाठी आवश्यक बहुमत असल्याचा विश्वास सरकारकडून व्यक्त केला जात आहे. राज्यसभेत देखील युती सरकार दोन तृतीयांश बहुमताच्या जवळ पोहोचले आहे.
किरेन रिजिजू आणि राहुल गांधींची भेट
पावसाळी अधिवेशन सुरु झाल्यापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह सभागृहात उपस्थित नसल्याचे म्हणत विरोधकांकडून गोंधळ घातला जात आहे. संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी विरोधी पक्षनेते राहुल गांंधी यांची भेट घेऊन ही कोंडी फोडण्याचा प्रयत्न केला. गेल्या दहा दिवसांत रिजिजू यांनी दुसऱ्यांदा राहुल गांधींची भेट घेतली आहे. राहुल गांधींची भेट घेतल्यानंतर रिजिजू यांनी गृहमंत्री अमित शाहांची देखील भेट घेतली आहे. रिजिजू अखिलेश यादव यांच्यासह इतर विरोधी पक्षातील नेत्यांची देखील भेट घेणार असल्याची माहिती समोर आलीय. दरम्यान, पावसाळी अधिवेशानात चर्चा न होताच आतापर्यंत ५ विधेयकं मंजूर झाली आहेत.
















zzlWzi8qqy8Un4Ec/s320/1001506655.jpg