शासनाने जाहीर केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत सहकारी बँकेतील १३०७१ तर व्यापारी बँकेतील ९८२ खातेधारक असे एकंदर १४०५४ खातेधारकांना १०५.१०७ कोटी रुपयांचं कर्ज माफ करण्यात येणार आहे.
यापैकी कर्जमाफीस पात्र असणाऱ्या ५३९४ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण झाले असून पात्र असलेल्या एकही शेतकरी कर्जमाफी योजने पासून वंचित राहणार नाही यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्नशील राहणार आहे. त्याचप्रमाणे कर्जमुक्त झालेल्या शेतकऱ्यांना नव्याने कर्ज घेण्याची मुभा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
राज्य सरकारने १ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२५ पर्यंत कर्ज घेतलेल्या व ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत थकबाकी असणाऱ्या शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी करण्यात आली आहे. यापैकी सहकारी बँकेतून कर्ज घेतलेल्या १३०७१ शेतकऱ्यांची ८९.५१ कोटी रुपयांची कर्ज माफ केली जाणार असून त्यापैकी पात्र शेतकऱ्यांच्या यादीत प्रसिद्ध झालेल्या १०४८४ शेतकऱ्यांची ५६.५७ कोटी रुपयांचे कर्ज माफ केले जाणार आहे.
ज्या शेतकऱ्यांची नावे कर्जमाफी योजनेअंतर्गत प्रसिद्ध झाली आहेत त्यांना प्राप्त झालेला विशिष्ट क्रमांक (आयडेंटिफिकेशन नंबर), आधार कार्ड तसेच कर्ज दर्शवणारे बँक पासबुक घेऊन आधार प्रमाणीकरण करण्याचे सुचित करण्यात आले आहे. त्यापैकी ५०९० शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण काम प्रगतीपथावर असून यामध्ये डहाणू तालुक्यातील शेतकऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. आधार प्रमाणीकरण शिल्लक असणाऱ्या शेतकऱ्यांना ऍग्रीस्टॅक आयडी मिळवण्यास तांत्रिक अडचणीचा सामना करावा लागत असल्याने त्यांच्यासाठी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात येत आहेत. तसेच जव्हार, मोखाडा येथील शेतकऱ्यांना इंटरनेट सुविधा मिळण्यास अडचण असल्याने अशा काही शेतकऱ्यांना प्रमाणीकरणासाठी पालघर येथे घेऊन येण्याची व्यवस्था जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांच्यामार्फत करण्यात आली आहे.
कर्जाच्या रकमेमध्ये वाद असल्यास, आधार क्रमांक मध्ये फरक असल्यास किंवा शेतकऱ्यांचे ठसे उमटत नसल्याने आधार प्रमाणीकरण होत नसल्यास अशा व्यक्तींना तक्रार करण्याची मुभा असून जिल्हास्तरीय कर्जमाफी समितीमार्फत अशा सर्व प्रकरणांची छाननी करण्यात येऊन कोणताही शेतकरी कर्जमाफी लाभापासून वंचित राहणार नाही यासाठी समितीमार्फत प्रयत्न केले जाणार असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था किसन रत्नाळे व जिल्हाधिकारी डॉ. इंदू राणी जाखड यांनी आयोजित पत्रकार परिषदेत नमूद केले. आधार प्रमाणीकरण झालेल्या लाभार्थ्यांना लवकरच कर्जमाफी रक्कम जमा होईल असेही सांगण्यात आले. या कमी काही अर्जांची ऑफलाईन पद्धतीने मंजुरी देण्यासाठी देखील समिती कार्यरत राहील असे सांगण्यात आले.
सन २०२२-२३ , २०२३-२४ व सन २०२४-२५ या आर्थिक वर्षापैकी कोणत्याही दोन वर्षी पीक कर्जाची उचल करून विहित मुदतीत परतफेड करणाऱ्या तसेच सन २०२५-२६ मधील पीक कर्ज विहित मुदतीत परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांपर्यंत अनुदान शासनाने या योजनेअंतर्गत जाहीर केले असून ठाणे जिल्हा सहकारी बँकेतून अशा लाभार्थ्यांना देखील या योजनेमध्ये समाविष्ट केले जात असल्याचे सांगण्यात आले. या कामासाठी पात्र शेतकऱ्यांनी पुढे यावं असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत करण्यात आले.
रात्री अकरा वाजेपर्यंत काम सुरू
राज्यभरात कर्जमुक्ती योजनेमध्ये अनेक लाभार्थी आपली माहिती संकेतस्थळावर देत असल्याने दिवसा या संकेतस्थळाचा वेग मंदावत असल्याचे दिग्दर्शनास आले आहे. त्यामुळे सायंकाळी उशिरा देखील काम सुरू ठेवून रात्री ११ वाजेपर्यंत शेतकऱ्यांची माहिती अपलोड करण्याचे काम सुरू असल्याची माहिती देण्यात आली. मोखाडा तालुक्यातील एका आजारी शेतकऱ्याच्या घरी जाऊन जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्थेच्या कर्मचाऱ्यांनी आधार प्रमाणीकरण केल्याची माहिती या प्रसंगी देण्यात आली.
दुर्गम भागातील शेतकऱ्यांना पीक कर्जाचा लाभ घ्यावा
सहकारी बँक तसेच व्यापारी बँकांना पीक कर्ज देण्यासाठी शासनाने कोटा ठरवून देणारा असून आगामी वर्ष विविध शासकीय योजना राबवताना पीक कर्ज सुलभपणे उपलब्ध होईल तसेच दुर्गम भागातील शेतकऱ्यांना विक कर्जाचा लाभ मिळण्यासोबत त्याचे महत्त्व पटवून देण्याचा दृष्टीने जिल्हा प्रशासनाने आखणी केल्याची माहिती जिल्हाधिकारी यांनी याप्रसंगी दिली.
















zzlWzi8qqy8Un4Ec/s320/1001506655.jpg