महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाची एक अत्यंत महत्त्वाची बैठक मुंबईत पार पडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांच्या हिताचा आणि कोकणवासियांच्या जिव्हाळ्याचा असे दोन मोठे निर्णय घेण्यात आले आहेत.
आगामी ‘जनगणना 2027’ च्या पार्श्वभूमीवर राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या या वर्षातील सर्वसाधारण बदल्यांना मुदतवाढ देण्यास मंत्रिमंडळाने अधिकृत मान्यता दिली आहे.
या निर्णयानुसार, आता राज्य शासनाला 30 जून 2026 पर्यंत शासकीय कर्मचाऱ्यांची बदली प्रक्रिया राबविता येणार आहे. यासाठी मूळ बदली अधिनियमात कायदेशीर सुधारणा करण्याचा मसुदाही मंजूर करण्यात आला आहे.
Census 2027 Impact : जनगणनेच्या पहिल्या टप्प्यामुळे बदल्या लांबणीवर
राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या सर्वसाधारण बदल्या दरवर्षी एप्रिल आणि मे महिन्यात केल्या जातात. मात्र, सध्या देशात ‘जनगणना 2027’ अंतर्गत पहिला टप्पा सुरू होत आहे. यामध्ये घरयादी तयार करणे व घरगणना करण्याचे अत्यंत महत्त्वाचे काम 16 मे 2026 ते 14 जून 2026 या कालावधीत केले जाणार आहे. जनगणनेच्या या राष्ट्रीय कामासाठी नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या या काळात करण्यात येऊ नयेत, असे स्पष्ट निर्देश केंद्र सरकारने दिले आहेत. त्यामुळेच राज्य सरकारने बदल्यांची मुदत 30 जून 2026 पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
Transfer Regulation Act : बदली अधिनियमात होणार मोठी सुधारणा
या मुदतवाढीसाठी ‘महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे नियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम 2005’ मध्ये आवश्यक ती सुधारणा केली जाणार आहे. मंत्रिमंडळाने या कायदेशीर मसुद्यास मंजुरी दिली असून, या मुदतवाढीबाबतचा अधिकृत अध्यादेश (Ordinance) राज्यपाल यांच्या स्वाक्षरीने आणि मान्यतेने लवकरच जाहीर केला जाईल. यामुळे जनगणनेच्या कामात कोणताही प्रशासकीय अडथळा येणार नाही.
आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत कोकणवासीयांसाठी दुसरा एक ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. कोकण रेल्वेचे शिल्पकार, माजी रेल्वेमंत्री आणि देशाचे माजी अर्थमंत्री, ज्येष्ठ नेते स्व. मधु दंडवते यांचे नाव सावंतवाडी रेल्वे स्थानकास देण्यास मंजुरी देण्यात आली आहे. राज्य सरकारच्या या प्रस्तावाला केंद्र सरकारची अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर, सावंतवाडी रेल्वे स्थानकाचे नवीन नाव अधिकृतपणे ‘लोकमान्य मधु दंडवते रेल्वे टर्मिनस’ असे होणार आहे.

















zzlWzi8qqy8Un4Ec/s320/1001506655.jpg