banner 728x90

पालघर जिल्ह्यात खत वितरणासाठी पॉस प्रणाली सुरळीत; शेतकऱ्यांनी अफवांवर विश्वास ठेवू नये; जिल्हा परिषदेतर्फे आवाहन

banner 468x60

Share This:

जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना अनुदानित रासायनिक खते उपलब्ध करून देण्यासाठी खत वितरणाची पॉईंट ऑफ सेल (पॉस) प्रणाली सुरळीतपणे सुरू असून, खत विक्री करताना कोणत्याही प्रकारची तांत्रिक अडचण नसल्याची माहिती जिल्हा कृषी विकास अधिकारी सोमनाथ पिंजारी यांनी दिली आहे.

अनुदानित रासायनिक खतांचे वितरण परवानाधारक निविष्ठा विक्रेत्यांमार्फत शेतकऱ्यांच्या हाताच्या ठशांच्या अथवा ओटीपीच्या आधारे पॉस POS मशीनद्वारे करण्यात येत आहे. सध्या ऑनलाइन पोर्टल व्यवस्थित सुरू असून जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये खत विक्री नियमितपणे सुरू आहे.

आज अखेर जिल्ह्यात ३,८०५ मेट्रिक टन खतसाठा उपलब्ध असून त्यामध्ये १,३४७ मेट्रिक टन युरिया खताचा समावेश आहे. याशिवाय १,१८५ मेट्रिक टन संरक्षित खतसाठाही उपलब्ध आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना खत मिळण्यासाठी १५ दिवस प्रतीक्षा करावी लागते किंवा आगाऊ ऑनलाइन बुकिंग करावे लागते, अशा प्रकारची कोणतीही व्यवस्था नसल्याचे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे.

banner 325x300

जर कोणत्याही कृषी सेवा केंद्राकडून शेतकऱ्यांना अशा प्रकारची माहिती देण्यात येत असेल, तर ती दिशाभूल करणारी असून अशा प्रकारे संभ्रम निर्माण करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे. खतासंदर्भात कोणतीही माहिती आवश्यक असल्यास शेतकऱ्यांनी संबंधित तालुका कृषी विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

जिल्ह्यात खरीप हंगाम सुरू होत असला तरी अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी खत खरेदीसाठी अनावश्यक घाई करू नये. युरियासोबत सेंद्रिय व मिश्र खतांचाही संतुलित वापर करावा. सर्व शेतकऱ्यांना आवश्यकतेनुसार खते उपलब्ध करून देण्यासाठी कृषी विभाग प्रयत्नशील असून, आवश्यक तेवढेच खत खरेदी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

याबाबत आशिष पाटील, अध्यक्ष, पालघर डिलर वेलफेअर असोसिएशन यांनी सांगितले की, जिल्ह्यातील सर्व परवानाधारक निविष्ठा विक्रेते पॉस मशीनद्वारेच खत विक्री करत आहेत. काही वेळा पोर्टलवर अल्पकालीन तांत्रिक अडचणी येऊ शकतात; मात्र १५ दिवस आधी ऑनलाइन बुकिंग केल्याशिवाय खत मिळत नाही, अशी कोणतीही प्रणाली अस्तित्वात नाही. शेतकऱ्यांनी अशा अफवा किंवा चुकीच्या माहितींवर विश्वास ठेवू नये, असे त्यांनी स्पष्ट केले. कृषी विभागाने जिल्ह्यात खतांचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचे सांगत शेतकऱ्यांना कोणत्याही अफवांपासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे.

banner 468x60

banner 468x60

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!