मध्य पूर्वेत सुरु असलेल्या युद्धाचा परिणाम भारतावर होताना दिसत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीयांना आवाहन केलं की, पेट्रोल-डिझेलचा वापर कमी करता. तसेच गॅस कमी वापरा आणि सोनं जवळपास वर्षभर खरेदी करु नका.
यानंतर भारतीयांसमोर मोठे प्रश्न उभे राहिले. अशातच केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी देखील आवाहन केलं आहे की, पेट्रोल, डिझेल आणि गॅसचा वापर कमी करा तसेच त्यांना एक दावा देखील केला आहे की, 25 रुपये दराने इंधन मिळणार आहे.
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचे हे विधान देशातील पेट्रोल आणि डिझेलवरील अवलंबित्व पूर्णपणे संपवण्याच्या दृष्टीने एक क्रांतीकारी पाऊल मानले जात आहे. इथेनॉल आणि इलेक्ट्रिक वाहनांच्या (EVs) वाढत्या वापरामुळे देशातील सर्वसामान्यांना केवळ स्वस्त आणि परवडणारा प्रवासच मिळणार नाही, तर वायू प्रदूषणापासूनही मोठी मुक्ती मिळणार आहे. याशिवाय, इंधनाची आयात कमी झाल्यामुळे देशाचा अब्जावधी रुपयांचा निधी वाचेल आणि त्याचा थेट फायदा ग्रामीण अर्थव्यवस्थेला होऊन शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल.
गडकरी यांच्या मते, सध्या देशातील वाढत्या प्रदूषणाचे सर्वात मोठे कारण पेट्रोल आणि डिझेलचा अमर्याद वापर हेच आहे. देशाचे परिवहन मंत्री म्हणून काम करताना, आज भारतात इलेक्ट्रिक स्कूटर, कार, बस, हायड्रोजन ट्रक आणि थेट इलेक्ट्रिक ट्रॅक्टर देखील रस्त्यावर धावण्यासाठी सज्ज असल्याचा त्यांना सार्थ अभिमान आहे. देशातील शेतकरी आता केवळ ‘अन्नदाता’ राहिला नसून, तो या इथेनॉल निर्मितीच्या माध्यमातून देशाचा ‘ऊर्जादाता’ आणि ‘इंधनदाता’ देखील बनत आहे, ही देशासाठी अभिमानास्पद बाब आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पर्यावरणपूरक आणि स्वस्त वाहतुकीबाबत आपले थेट अनुभव सांगत इंधनाची नवी दिशा स्पष्ट केली. “आज मी स्वतः वापरत असलेले वाहन हे 100 टक्के बायो-इथेनॉलवर चालते. सध्या इथेनॉलचा दर 65 रुपये प्रति लिटर आहे. मात्र, धावताना हे वाहन 60 टक्के वीज निर्माण करत असल्याने, पेट्रोल-डिझेलच्या तुलनेत प्रत्यक्ष गाडी चालवण्याचा प्रभावी खर्च केवळ 25 रुपये प्रति लिटर येतो,” असा मोठा खुलासा त्यांनी केला. गेल्या दीड वर्षांपासून ते स्वतः हे अत्याधुनिक वाहन वापरत आहेत.
गडकरी यांनी स्पष्ट केले की, हे बायो-इथेनॉल पूर्णपणे स्वदेशी आणि पर्यावरणपूरक असून, यामुळे प्रदूषणाला आळा बसेल आणि इंधन आयातीवरील देशाचा खर्चही वाचेल. अशा प्रकारची फ्लेक्स-फ्यूएल इंजिन (Flex-Fuel Engine) असलेली वाहने लवकरच भारतीय बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर उपलब्ध करून दिली जातील, अशी ग्वाही देखील त्यांनी या प्रसंगी दिली.


















zzlWzi8qqy8Un4Ec/s320/1001506655.jpg