रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. मध्य रेल्वेकडून १ ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत विशेष तिकीट तपासणी मोहीम राबवण्यात येणार आहे. या मोहिमेदरम्यान प्रवाशांच्या तिकिटांची वैधता आणि सत्यता तपासण्यासोबतच सवलतीच्या दरातील तिकिटे, विशिष्ट आरक्षण कोटा आणि विविध पासद्वारे आरक्षित तिकिटांचीही तपासणी केली जाणार आहे.
त्यामुळे प्रवाशांनी प्रवास करताना आवश्यक मूळ ओळखपत्र सोबत ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
रेल्वे स्थानकांवर तसेच प्रवासादरम्यान तिकीट तपासणी केली जाणार आहे. आरक्षण सुविधांचा गैरवापर रोखणे, सवलतींचा आणि विविध पासचा गैरवापर थांबवणे तसेच रेल्वेच्या महसुलातील गळती रोखणे हा या मोहिमेचा उद्देश आहे. सवलत किंवा विशिष्ट आरक्षण कोट्यांतर्गत प्रवास करणाऱ्या प्रवाशांना त्यांची पात्रता सिद्ध करण्यासाठी आवश्यक असलेली विहित मूळ कागदपत्रे सोबत बाळगावी लागणार आहेत.
एकाच तिकिटावर अनेक प्रवाशांचे आरक्षण असल्यास त्या तिकिटावरील किमान एका प्रवाशाकडे मूळ ओळखपत्र असणे आवश्यक राहणार आहे. आवश्यक ओळखपत्र किंवा पात्रतेचा पुरावा उपलब्ध नसल्यास लागू नियमांनुसार त्या तिकिटावर प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांना वैध तिकिटाशिवाय प्रवास करणारे मानले जाऊ शकते. अशा परिस्थितीत संबंधित प्रवाशांना नियमानुसार दंड भरावा लागू शकतो.
याशिवाय ई-पास किंवा पीटीओवर प्रवास करणाऱ्या प्रवाशांनीही विहित मूळ ओळखपत्र सोबत ठेवणे आवश्यक आहे. प्रवास सुरू करण्यापूर्वी ई-पास किंवा पीटीओच्या आधारे प्रवासासाठी आवश्यक अधिकृत तिकीट किंवा पास मिळाला आहे, याची खात्री करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. त्यामुळे १ ऑक्टोबरपासून रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी तिकीटासोबत आवश्यक ओळखपत्र आणि लागू असल्यास पात्रतेची मूळ कागदपत्रे सोबत ठेवणे महत्त्वाचे ठरणार आहे.


















zzlWzi8qqy8Un4Ec/s320/1001506655.jpg