भारतात लवकरच प्लास्टिक म्हणजेच पॉलिमर नोटांचा वापर सुरू होणार आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) 10 रुपये आणि 20 रुपयांच्या प्रत्येकी 1-1 अब्ज पॉलिमर नोटांच्या प्रत्यक्ष चाचणीसाठी दिलेला प्रस्ताव केंद्रीय अर्थ मंत्रालयाने मंजूर केला आहे.
केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी लोकसभेत एका लेखी प्रश्नाच्या उत्तरात या महत्त्वाच्या निर्णयाची अधिकृत माहिती दिली.
कागदी नोटांपेक्षा अधिक टिकाऊ आणि सुरक्षित
भारतीय हवामान आणि दैनंदिन वापरातील परिस्थितीत पॉलिमर नोटा किती टिकतात, हे तपासण्यासाठी आरबीआयकडून ही प्रायोगिक चाचणी घेतली जात आहे. रिझर्व्ह बँकेच्या मते, सध्याच्या कागदी नोटांपेक्षा पॉलिमर नोटा अधिक मजबूत आणि टिकाऊ असतात. भारतात रोख रकमेचा वापर मोठ्या प्रमाणावर होतो. कागदी नोटा लवकर मळतात, फाटतात किंवा खराब होतात. याउलट पॉलिमर नोटांचे आयुष्य खूप जास्त असते, असा जागतिक अनुभव आहे. या प्राथमिक चाचण्या यशस्वी झाल्यानंतरच पॉलिमर नोटांचा देशभरात मोठ्या प्रमाणावर वापर करण्याबाबत पुढील निर्णय घेतला जाईल.
कागदी नोटा बंद होणार का? सरकारने दिले स्पष्टीकरण
पॉलिमर नोटा बाजारात आल्यामुळे सध्याच्या कागदी नोटा टप्प्याटप्प्याने बंद केल्या जातील का, असा प्रश्न उपस्थित केला जात होता. यावर सरकारने स्पष्टीकरण दिले आहे. अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी याबाबत म्हटलं की, “कागदी नोटा पूर्णपणे बंद करून त्यांच्या जागी केवळ पॉलिमर नोटा आणण्याचा कोणताही विचार किंवा प्रस्ताव सध्या सरकारच्या विचाराधीन नाही. पॉलिमर नोटा सध्याच्या कागदी नोटांसोबतच बाजारात चलनामध्ये राहतील.”
डिजिटल पेमेंटवर परिणाम होणार?
पॉलिमर नोटांमुळे यूपीआय (UPI) किंवा डिजिटल व्यवहारांवर काही परिणाम होईल का? यावर आरबीआयने सांगितले की, याबाबत आताच अंदाज बांधणे घाईचे ठरेल. भौतिक नोटा आणि डिजिटल पेमेंट सिस्टीम या दोन्ही पद्धती एकमेकांना पूरक असून त्या भविष्यातही एकत्रच सुरू राहतील.
















zzlWzi8qqy8Un4Ec/s320/1001506655.jpg