banner 728x90

मितभाषी; परंतु कामाचं नेतृत्व…

banner 468x60

Share This:

पालघर-योगेश चांदेकर

पालघर- नेता हा केवळ आदेश देणारा असून चालत नाही, तर अनुयायांचं म्हणणं ऐकून त्यांच्यातील चांगल्या सूचना विचारात घेऊन, त्यानुसार कार्य करणारा असावा लागतो. कार्यकर्त्यांना विधायक दिशा देण्याचं काम नेता करत असतो. त्याचबरोबर स्वतःही तसं वागतो, असाच नेता मोठा होतो. डहाणू जनता बँकेचे अध्यक्ष आणि डहाणू नगरपालिकेचे नगरसेवक मिहीरभाई शहा हे अशाच एका नेतृत्वापैकी एक समजले जातात. पडद्यामागं राहून मोठं काम करणाऱ्या नेत्यांमध्ये त्यांची गणना होते. एखादा नेता यशस्वी कधी होतो, याचं जर मूल्यांकन करायचं झालं, तर जो नेता आपल्या टीमकडून चांगलं काम करून घेतो आणि स्वतःही त्या कामाच्या आधारावर आणखी चांगलं काम करतो, तो नेता मोठा होत असतो. मिहीरभाई त्यातलेच. त्यांच्या वाढदिवसाला हार्दिक शुभेच्छा!

banner 325x300

नेता कसा असावा….?
नेता आईसारखा प्रेमळ, बापासारखा करारी असावा.
भावासारखा मदतीला धावणारा, बहिणीसारखा मायाळू असावा
नेता सूर्याहून तेजस्वी, शितल चंद्रासारखा असावा.
नेता बृहस्पतीहून बुद्धीवान, रूपवान इंद्रासारखा असावा.
नेता विशाल सिंधू असावा, अमृताचा बिंदू असावा.
नेता वज्राहून कठोर, लोण्यासारखा मृदू असावा.
नेता हिमालयाहून उंच, सागरासारखा खोल असावा.
सुखात किंवा दुखात, समतोल असावा.
नेता कर्णासारखा उदार, कृष्णासारखा धोरणी असावा.
नेता गजेंद्रासारखा बलवान, सिंहासारखा शूर असावा.
रयतेला हवा हवासा वाटणारा,
नेता शिवबांसारखा असावा.

नेत्याचं वर्णन एका कवीनं वरील पंक्तीत केलं आहे. अशा सर्वगुणसंपन्न परिभाषेतलं नेतृत्व आता दुर्मीळ असलं, तरी काही नेते त्याच्या जवळपास जाऊ शकतात. मिहीरभाई शहा त्यात मोडतात. अलीकडच्या काळात कुणी कुणाचं ऐकत नाही. राजकारणात कार्पोरेटता आली आहे. असं असलं तरी व्यावसायिकता आणि त्याचं समायोजन करण्यात जो यशस्वी होतो, तोच नेता आपल्या जीवनात पुढं जातो. केवळ व्यक्तिगत प्रगती ही नेतृत्वाचा गुण नसते, तर आपल्याबरोबर समाजाला पुढं घेऊन जातो, तोच खरा नेता असतो. मिहीरभाई यांच्या अंगी ते गुण नक्की आहेत. त्यांच्या कार्यशैलीत दिखावा नाही. स्वभाव अतिशय विनम्र आहे. अतिशय संयमी आहे. दूरदृष्टीचा आहे. ज्या संस्थांवर आपण काम करतो, त्या संस्थांना पुढं न्यायचं असेल, तर काय काय करावं लागेल, याची पक्की खूणगाट त्यांच्या मनाशी बांधलेली असते. कोणतीही गोष्ट सहज मिळत नसते, तर त्यासाठी कष्ट करावे लागतात. संघर्ष करावा लागतो. प्रश्नांचा अभ्यास करावा लागतो आणि संघर्ष करताना हा अभ्यासच उपयोगी पडतो हे मिहीर शहा यांच्या अनुभवावरून लक्षात येतं. डहाणू हे आदिवासी, नागरी आणि सागरी अशा मिश्रित वस्तीचं गाव किंवा फार तर लहान शहर म्हणावं अशी स्थिती. पर्यटन विकास करायचा असेल, तर तिथल्या नियमांची पायमल्ली होता कामा नये, हे लक्षात घ्यावं लागतं. त्यात डहाणू हे संवेदनशील क्षेत्रात वसलेलं. त्यामुळं काम करताना अधिक काळजी घ्यावी लागते. डहाणूला विकास आराखडाच नव्हता.मिहीर शहा नगराध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी डहाणू शहराचा विकास आराखडा मंजूर करून घेतला. १३ मार्च २०२३ ही ती तारीख अजूनही अनेकांच्या लक्षात आहे. विकास करताना अनेकदा शहराची ओळख पुसली जाते. शहरं सिमेंट काँक्रीटची जंगलं होतात. मिहीरभाईंना हे होऊ द्यायचं नव्हतं. त्यासाठी संयमी, शांत स्वभाव आणि सर्वांना विश्वासात घेऊन काम करण्याची तयारी असावी लागते. मिहीरभाईंकडं ती होती.
पर्यावरण, स्थानिक संस्कृती आणि नागरिकांचा सहभाग या त्रिसूत्रीवर भर देऊन त्यांनी काम केलं. नगरसेवक म्हणून २००९ मध्ये नगरपालिकेत पाऊल टाकल्यापासून त्यांनी शहराच्या विकासाला एक दिशा दिली. सत्तेसाठी कोणतीही तडजोड करायची नाही आणि मूलभूत प्रश्नांपासून दूर जायचं नाही, हे ध्येय त्यांनी कायम ठेवलं. त्यासाठी सभागृहात अभ्यासपूर्ण मांडणी करायची, प्रशासनाशी संवाद साधायचा आणि नागरिकांच्या प्रश्नांवर नेमकी भूमिका घ्यायची यावर त्यांचा भर राहिला. शरद पवार आणि आनंदभाई ठाकूर यांच्याबरोबर काम करताना विकासाचं राजकारण कसं करायचं याचे धडे त्यांना मिळाले. पक्षातील सर्वसामान्य कार्यकर्त्यापासून जिल्हा पातळीवरील जबाबदाऱ्यापर्यंत त्यांचा प्रवास हा विलक्षण प्रेरणादायी आहे. नगराध्यक्ष, विरोधी पक्षनेते म्हणून काम करताना डहाणूचा पाणीपुरवठा, रस्त्यांचं डांबरीकरण तारपा चौक, क्रीडांगण आदी अनेक काम त्यांनी केली. आपल्या शिक्षणाचा वापर समाजासाठी कसा करता येईल, यावर त्यांचा कायम भर आहे. वाणिज्य शाखेचे पदवीधर असल्यानं आर्थिक क्षेत्राचं ज्ञान त्यांना मिळालं. डहाणू जनता बँकेचं अध्यक्षपद त्यांच्याकडं आलं, तेव्हा त्यांनी बँकेच्या प्रगतीला एक दिशा दिली. मीपणा त्यांच्या अंगी कधीच नव्हता. त्याच्याऐवजी आम्ही ही मानसिकता त्यांनी रुजवली आणि वैयक्तिक फायद्यापेक्षा सामूहिक फायद्यावर त्यांनी भर दिला. नगरपालिकेच्या गेल्या निवडणुकीत त्यांनी सहज उमेदवारी मिळवली असती; परंतु तसं न करता सहकाऱ्यांना मोठं करणं, त्यांना मार्गदर्शन करणं आणि आपण ‘किंगमेकर’ च्या भूमिकेत असणं याला त्यांनी प्राधान्य दिलं. त्यातूनच डहाणू नगरपालिकेच्या निवडणुकीत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला आठ जागा मिळवून देण्यात त्यांचं मोलाचं योगदान आहे. विरोधकांची मोट बांधण्यातही त्यांची भूमिका महत्त्वाची होती. त्यामुळं तर डहाणू नगरपालिकेत नगराध्यक्षपदाचा उमेदवार निवडून आणता आला. मित्रपक्षानं स्वबळाचा इशारा दिल्यानंतर अजिबात डगमगून न जाता त्यांनी पॅनल उभं करण्यामध्ये मोठी भूमिका घेतली. शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अशा सर्व मित्र पक्षांना एकत्र आणलं. त्यात त्यांना यश आलं. आरोप -प्रत्यारोपापेक्षा विकासावर भर देण्याची त्यांची कृती नागरिकांच्या पसंतीस पडली. नगराध्यक्ष निवडीतील शिल्पकार म्हणून त्यांना जनता ओळखते. व्यापाऱ्यांशी असलेले संबंध आणि डहाणूतील विकासाचा एक उदयोन्मुमुख चेहरा अशी ही त्यांची ओळख आहे.
गेल्या वर्षी झालेल्या डहाणू जनता सहकारी बँकेतील निवडणुकीत त्यांनी पक्षीय राजकारण बाजूला ठेवून सर्वसमावेशक आघाडी तयार केली आणि या आघाडीला डहाणू जनता बँकेतील सत्ता मिळवून दिली. अर्थात मिहीरभाई हे पूर्वीही नगराध्यक्ष होते आणि डहाणू जनता बँकेचे अध्यक्ष होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला आलेल्या डहाणू नगरपालिकेतील आठ जागा निवडून आणण्यात त्यांना यश मिळालं. आता डहाणूत नगराध्यक्ष एका पक्षाचा आणि बहुमत दुसऱ्या पक्षाला अशी स्थिती असली, तरी डहाणूच्या विकासासाठी पक्षीय मतभेद बाजूला ठेवायचे आणि विकासाच्या कामात राजकारण आणायचं नाही ही त्यांची भूमिका आहे. डहाणू जनता बँकेत त्यांनी अत्याधुनिक यंत्रणा उभारण्यावर जसा भर दिला, तशीच अत्याधुनिक यंत्रणा आता डहाणू नगरपालिकेत उभारण्याचा त्यांचा मानस आहे. डहाणूतील नागरिकांना घरपट्टी मालमत्ता कर व अन्य सेवा डिजिटल पद्धतीनं कशा देता येतील, याकडं त्यांचं लक्ष आहे. नगरपालिकेच्या निवडणुकीत जनतेला दिलेली आश्वासनं पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची डहाणू विकासाची संकल्पना, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डहाणू विकास आराखडा मंजूर करण्यासाठी केलेलं सहकार्य तसंच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडं असलेली महत्त्वाची खाती यांचा त्रिवेणी संगम करून डहाणूचा विकास आराखडा प्रत्यक्षात आणण्यावर त्यांचा भर आहे. नगरपालिकेची सत्ता जरी जनतेनं संमिश्र दिली असली, तरी शहराच्या विकासासाठी पक्षभेद विसरून काम करायचं, ही जी संकल्पना मिहीरभाई यांनी मांडली, तीच आता सर्वांना पुढं घेऊन जावी लागणार आहे. डहाणू जनता बँकेच्या निवडणुकीतही डहाणू जनता विकास आघाडीचे सर्व सदस्य निवडून आणण्यामध्ये मिहीरभाईंचा मोठा वाटा आहे. बँकेच्या कारभाराची अडीच वर्षे त्यांच्याकडं आहेत. या काळात डहाणू जनता को-ऑपरेटिव्ह बँकेचा शाखा विस्तार करण्याबरोबरच या बँकेचं डिजिटलायझेशन करण्यावर त्यांचा भर आहे. कोअर बँकिंग, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, घरबसल्या बँकिंग सुविधा अशा अनेक सुविधा ते देणार आहेत. कुणालरही टीका न करता कामाच्या माध्यमातून उत्तर देण्याची त्यांची वृत्ती जनतेला चांगलीच भावते. जनतेशी असलेली बांधिलकी आणि त्याला दिली जाणार असलेली कामाची जोड यामुळं जनता ही त्यांच्या पाठीशी कायम राहते. केवळ राजकारण आणि आर्थिक क्षेत्र यापुरतंच मिहीरभाईंचं काम मर्यादित नाही, तर त्यांची वृत्तीच मुळात मदतीची आहे. अडल्या नडलेल्यांना मदत करणं, सामाजिक बांधिलकीतून इतरांच्या उपयोगी पडणं यावर त्यांचा भर असतो. गेल्या दहा वर्षांपूर्वी त्यांनी डहाणूमध्ये क्रेडो वर्ल्ड स्कूल हे ‘सीबीएससी पॅटर्न’चं पहिलं स्कूल डहाणूत सुरू केलं. त्यांच्या कुटुंबांनं डहाणू दशरी माळी समाज हॉलसाठी जमीन दान केली. त्या ट्रस्टचे मिहीरभाई १५ वर्षे विश्वस्त आहेत. डहाणू येथील सत्संग मंडळाशी ते गेल्या २५ वर्षांपासून संबंधित आहेत. त्याचं नेतृत्व आणि कार्य स्थानिक पातळीवर प्रभावी ठरतं आहे. जो नेता कार्यकर्त्यात विश्वास निर्माण करतो, तोच नेता विश्वासानं सर्वांना बरोबर घेऊन जातो आणि असं नेतृत्व हे एकतर्फी असत नाही, ते तर ते द्विमार्गी असतं. त्यामुळं संघटना अधिक सक्षम होते. मिहीरभाई शहा यांचं हे नेतृत्व अशा प्रकारातलं आहे. त्यामुळंच ते पक्षाला, संस्थांना आणि समाजालाही बरोबर घेऊन चालतात. अशा या नेतृत्वाला त्यांच्या ५३ व्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!

banner 468x60

banner 468x60

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!