विधीमंडळातील सध्याचे संख्याबळ पाहता महाविकास आघाडीचा एकच उमेदवार राज्यसभेवर निवडून जाण्याची शक्यता आहे. त्यासाठी प्रत्येक पक्ष दावा करत आहे. मात्र, उद्धव ठाकरे यांनी विधान परिषदेवर जावे आणि भारतीय जनता पक्षाविरोधात लढण्यासाठी राज्यसभेवर काँग्रेसच्या उमेदवाराला निवडून द्यावे, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी रविवारी येथे केली.
काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी एक वर्ष झाल्याच्या निमित्ताने हर्षवर्धन सपकाळ यांचा शहर काँग्रेसच्या वतीने सत्कार करण्यात आला. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही मागणी केली. शहराध्यक्ष अरविंद शिंदे, गटनेते ॲड. रामचंद्र उर्फ चंदू कदम, माजी मंत्री रमेश बागवे, प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, प्रशांत जगताप, माजी आमदार दिप्ती चवधरी यावेळी उपस्थित होते. राज्यसभा आणि विधान परिषदेची निवडणूक महाविकास आघाडी म्हणूनच लढविली जाईल, असेही सपकाळ यांनी स्पष्ट केले.
सपकाळ म्हणाले, ‘ प्रत्येक अधिवेशनात गोंधळ घालत लोकशाहीला तिलांजली देण्याची भूमिका सत्ताधारी पक्षाची आहे. मात्र, सरकारने विविध घोटाळ्यांच्या प्रश्नांना उत्तरे द्यावीत, त्यासंदर्भात श्वेतपत्रिका काढवी, अशी आमची मागणी आहे. विधिमंडळाच्या अधिवेशनात महाविकास आघाडीकडून सरकारला धारेवर धरले जाईल.
‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दबावाखाली येत अमेरिकेसोबत केलेल्या व्यापार करारामुळे सोयाबीन,मका, कापूस उत्पादकांना फटका बसणार आहे. त्याबाबत जागृती करण्यासाठी आम्ही राज्यात पदयात्रा काढणार आहोत. ‘एपस्टीन फाइल्स’मध्ये मोदी सरकारमधील मंत्री आणि उद्योगपतींचे नाव आले. मात्र, मोदी सरकारने काहीच केले नाही. माजी लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांच्या पुस्तकातील गोष्टींवरही खुलासा केलेला नाही,’असी टीकाही सपकाळ यांनी केली.
काँग्रेस भवनावरील हल्ल्यावेळी पोलिसांवर दबाव
भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पुण्यातील काँग्रेस भवनवर हल्ला केला. त्यादिवशी पोलिसांवर कोणाचा दबाव होता, अशी विचारणा करत ‘पोलिसांनी आज दिलेली सुरक्षाव्यवस्था त्या दिवशी का दिली नाही याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणीही हर्षवर्धन सपकाळ यांनी केली. काँग्रेसमध्ये हिंसेला थारा नाही. मात्र आम्हीही जशास तसे उत्तर देऊ शकतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.
















