मागील एक महिनाभरापासून दिल्लीतील जंतर मंतर येथे नीट (NEET) परीक्षेतील कथित पेपरफुटी प्रकरणावरून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन सुरू आहे.
याच आंदोलनस्थळी पर्यावरणवादी कार्यकर्ते अशी ओळख असलेले सोनम वांगचुक यांनी आमरण उपोषण सुरू केलं होतं. मात्र, शनिवारी दिल्ली पोलिसांनी वांगचुक यांना बळजबरीने आंदोलन स्थळावरून रुग्णालयात भरती करण्यात आलं.
त्यानंतर आक्रमक झालेले सीजेपीचे प्रमुख अभिजीत दिपके यांनी उपोषण सुरू केलं होतं. तर आज २० जुलै रोजी सीजेपीकडून संसदेवर मोर्चा काढण्याची घोषणा करण्यात आली होता. या मोर्चाला दिल्ली पोलिसांनी परवानगी नाकारली होती. मात्र, आंदोलक संसदेवर मोर्चा काढण्याच्या भूमिकेवर ठाम आहेत. आंदोलक संसद भवनाच्या रस्त्यापर्यंत पोहोचले देखील आहेत.
अशातच आता एक मोठी बातमी समोर आली आहे. ती म्हणजे सरकारने आंदोलकांशी चर्चा करण्याची तयारी दर्शवल्याची माहिती समोर आली आहे. कॉकरोच जनता पार्टीचे मुख्य प्रवक्ते असलेल्या सौरव दास यांनी ट्विटद्वारे जे.पी. नड्डा आंदोलकांशी चर्चा करणार असल्याची माहिती दिली आहे.
दास यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिलं आहे की, “आता सकाळचे ११:५२ वाजले आहेत. ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या वतीने आशुतोष रांका आणि मी जे.पी. नड्डा यांची भेट घेण्यासाठी निघालो आहोत. सरकारने आज सकाळीच चर्चेसाठी संपर्क साधला होता. आमच्या मागण्या स्पष्ट आहेत. मोठ्या संख्येने तरुण एकत्र जमले आहेत.” असं त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
त्यामुळे आता आंदोलकांसमोर केंद्र सरकार झुकलं आणि चर्चेसाठी तयार झाल्याचं बोललं जात आहे. तर भाजप नेते जे.पी.नड्डा आणि सीजेपीचे आशुतोष रांका यांच्यात नेमकी काय चर्चा होणार? आणि या सर्व परिस्थितीवर तोडगा निघणार का? अभिजीत दीपके यांच्या मागण्या मान्य होणार का? याकडे आंदोलकांसह देशभरातील नागरिकांचं लक्ष लागलं आहे.


















zzlWzi8qqy8Un4Ec/s320/1001506655.jpg