कर्तृत्ववान, शिस्तप्रिय असलेल्या अजित पवारांकडे मुख्यमंत्रीपदासाठी आवश्यक संपूर्ण क्षमता, दृढनिश्चय आणि प्रामाणिकता होती. त्यांच्या रूपात महाराष्ट्राला एक चांगला मुख्यमंत्री मिळू शकला मात्र तो आता आपल्यामध्ये नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या.
विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाबद्दल विधानसभेत शोकप्रस्ताव मांडत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. कर्तृत्ववान आणि शब्दाला जागणाऱ्या अजितदादांच्या रूपाने आपण वैयक्तिक मित्र गमावला असल्याची भावनाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
अजित पवारांसारखा नेता जेव्हा आपल्यातून निघून जातो, तेव्हा खऱ्या अर्थाने पोकळी म्हणजे काय हे लक्षात येते. ती पोकळी केवळ राजकीय नाही, तर भावनिकही आहे. काही जखमा काळ बऱ्या करतो, पण काही वेदना कायम राहतात, अशी भावना फडणवीस यांनी व्यक्त केली.
अजितदादा हे कार्यमग्नतेचे प्रतीक होते. वक्तशीरपणा, शिस्त आणि निर्णयक्षमतेची सांगड त्यांनी आपल्या संपूर्ण राजकीय कारकिर्दीत घातली. मंत्रालयात वेळेआधी उपस्थित राहून दिवसभर कामकाजाचा आढावा घेणे आणि कोणतीही फाइल प्रलंबित न ठेवणे ही त्यांची कार्यपद्धती होती. त्यांच्या उपस्थितीमुळे प्रशासनात एक वेगळी ऊर्जा निर्माण होत असे. प्रत्येक विषयाचा बारकाईने अभ्यास, स्पष्ट भूमिका आणि निर्णय घेण्यातील धाडस यामुळे ते प्रभावी प्रशासक म्हणून ओळखले जात. लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांमध्ये त्यांच्याविषयी विश्वासाची भावना होती. राज्यहिताचा प्रश्न आला की, राजकीय भेदाभेद बाजूला ठेवून सकारात्मक भूमिका घेणे अजितदादांची कार्यसंस्कृती होती असे गौरवोद्गार फडणवीस यांनी काढले.
वित्त, शेती, सिंचन क्षेत्रांत दूरगामी निर्णय
राज्याच्या विकासात अजित पवार यांनी दिलेल्या योगदानाचा उल्लेख करत मुख्यमंत्री म्हणाले की, पायाभूत सुविधा, वित्त, शेती आणि सिंचन या क्षेत्रांत त्यांनी ठोस आणि दूरगामी निर्णय घेतले. लोककल्याणाच्या योजनांबाबत त्यांनी ठाम भूमिका घेत राज्याच्या सर्वसामान्य नागरिकांपर्यंत लाभ पोहोचविण्यासाठी प्रयत्न केले, असे फडणवीस म्हणाले.
सार्वजनिक जीवनात मोठी पोकळी दादांचे अस्तित्व सगळीकडे ठळकपणे जाणवत असे. त्यांनी कोणत्याही संघर्षाला कधी पाठ दाखविली नाही. दादांच्या जाण्याने राज्याच्या सार्वजनिक जीवनात मोठी पोकळी निर्माण झाली आहे, असे फडणवीस म्हणाले. त्यांच्या कार्याचा ठसा आणि त्यांनी निर्माण केलेली कार्यसंस्कृती पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी राहील, अशा शब्दात फडणवीस यांनी भावनांना वाट करून दिली. यावेळी माजी मंत्री सुरुपसिंग नाईक, डॉ. शालिनीताई पाटील, राज खंगारजी पुरोहित तसेच माजी सदस्य गंगाधर महालप्पा पटने, नीळकंठ चिंतामण फालक, विश्वास रामचंद्र नांदेकर आणि रुपलेखा खंडेराव ढोरे यांच्या निधनाबद्दलही फडणवीस यांनी शोक व्यक्त केला.
















