महाराष्ट्र सरकारने नमो शेतकरी योजनेच्या ८व्या हप्त्यासाठी १७७४ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.
गेल्या ३ महिन्यांपासून प्रतीक्षा करणाऱ्या शेतकऱ्यांना लवकरच पैसे मिळणार आहेत.
सप्टेंबरनंतर प्रथमच हप्ता दिला जाणार असून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
राज्यातील शेतकऱ्यांसाठी दोनच दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा करत शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा केला जाईल असे म्हटले होते. त्यांनी राहुरी इथल्या महात्मा फुले कषी विद्यापीठाच्या 39 वा पदवीदान समारंभात ही घोषणा करताना पुढील वर्षांपासून शेतकऱ्यांना दिवसा 12 तास मोफत वीज पुरवठा होईल, अशी महाराष्ट्र सरकार तयारी करत असल्याचे म्हटले होते. या घोषणेनंतर शेतकऱ्यांना दिलासा मिळेल अशी चर्चा सुरू झाली होती. तोच आता राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून थकलेल्या नमो शेतकरी योजनेच्या आठवा हप्त्या वितरणाला सरकारने मंजुरी दिली आहे. याबाबत सोमवारी (ता.१६) निर्णय झाला असून शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. यामुळे लवकरच नमो शेतकरी महासन्मान निधीचा आठवा हप्त्याचा निधी शेतकऱ्यांना मिळेल.
पीएम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता वितरीत केल्यानंतर एका आठवड्यात त्याच लाभार्थ्यांना नमोचा हप्ता दिला जातो. या प्रमाणे पीएम किसानच्या २१ व्या हप्त्यासोबत नमोचा आठवा हप्ता जमा होईल, अशी शक्यता होती. पण पीएम किसानचा २१ वा हप्ता नोव्हेंबर महिन्यात वितरीत झाल्यानंतरही नमोचा आठवा हप्ता जमा झाला नाही.
यामुळे मागील तीन महिन्यांपासून शेतकरी नमोच्या हप्त्याची प्रतिक्षा करत होते. दरम्यान सोमवारी सरकारने आठव्या हप्त्यासाठी १ हजार ७७४ कोटी रुपयांचा निधी वितरणास मान्यता दिली आहे. याबाबत शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे. याआधी २०२५ च्या सप्टेंबर महिन्यात नमोच्या सातव्या हप्त्याचं वितरण करण्यात आलं होतं. त्यावेळी राज्यातील ९१ लाख ६५ लाख १५६ शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये १८९२ कोटी ६१ लाख रुपये जमा करण्यात आले होते.
पण आठवा हप्ता जमा झाला नव्हता. तर तो डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात जमा होईल अशी शक्यता होती. परंतु वित्त विभागाने निधीच्या अडचणीमुळे नमोसाठी निधी मंजूर केलेला नव्हता. ज्यानंतर शेतकरी नमोच्या आठव्या हप्त्याची प्रतिक्षा करत होते.
दरम्यान आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या आठव्या हप्त्यासाठी राज्य सरकारने निधी मंजूर केला आहे. लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर रक्कम जमा केली जाईल. राज्यातील एकूण ६५ लाख १५३ शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे जमा करण्यात येणार असून यासाठी १८९२ कोटी ६१ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. तसेच राज्य सरकारने केवळ आठव्या हप्त्याचे वितरण करण्यात येणार असल्याचे शासन निर्णयात स्पष्ट केले आहे.

















