पालघर-योगेश चांदेकर
राजकारणात कायम शत्रू समजून एकमेकांना संपवण्याचं राजकारण करायचं नसतं, तर सौहार्दाचं, संयमाचं, विश्वासाचं राजकारण करायचं असतं, असा विचार करणारी फार थोडी माणसं राजकारणात असतात. स्वतः किंग होण्यापेक्षा माणसं घडवण्यावर ज्यांचा विश्वास असतो, अशा राजकारण्यांत आनंदभाई ठाकूर यांचं नाव अग्रक्रमानं घेतलं जातं. त्यांचा आज वाढदिवस.

राजकारणात दोन प्रकारे मोठं होता येतं. त्यातला पहिला मार्ग म्हणजे जनतेची कामं करून त्यांच्या हृदय सिंहासनावर आरूढ होऊन त्यांच्या मदतीनं शून्यातून विश्व निर्माण करणं आणि दुसरा मार्ग म्हणजे दुसऱ्यानं केलेल्या कामाचं श्रेय लाटून, फसवणूक करून मोठं होणं. दुसऱ्या वर्गातील नेत्यांची संख्या जास्त असताना पहिल्या वर्गात मोडणारे आनंदभाई ठाकूर यांच्यासारखे नेते दुर्मिळच. राजकारणात एकमेकांचे पाय ओढून पुढं जाण्यात धन्यता मानली जाते;परंतु काही नेते असे असतात, की त्यांना गटबाजी, पक्षांतर्गत कलह मान्य नसतो. दुसऱ्याची रेषा पुसण्यापेक्षा स्वतःची रेषा मोठी करण्यात असे नेते धन्यता मानत असतात. आनंदभाईंवर बोर्डी येथील ईश्वरभाई शाह यांचे संस्कार झाले. राजकारण हे साधनशूचितेसाठी करायचं असतं. हा धडा त्यांना तिथं मिळाला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, अजित पवार आणि गणेश नाईक यांना आपले गुरू म्हणून त्यांनी राजकारण केलं. राजकारणात मिळालेल्या पदाचा उपयोग स्वतःसाठी करायचा नसतो, तर त्या पदाच्या माध्यमातून जनतेचे प्रश्न मार्गी लावायचे असतात, हे तत्त्व त्यांनी आयुष्यभर जपलं. पालघर जिल्हा आणि जिल्ह्यातील जनता हेच आपलं दैवत म्हणून त्यानुसार त्यांनी काम केलं. कोणत्याही पदासाठी कधीच कुणापुढं हात पसरण्याची वेळ त्यांच्यावर आली नाही. पदं त्यांच्याकडं चालत आली आणि मिळालेल्या पदाचा उपयोग त्यांनी सामान्यांच्या जीवनात बदल घडवण्यासाठी केला. आर्थिक संस्था असो की शिक्षण संस्था; आपला ‘टार्गेट गट’ कोणता आहे आणि त्यासाठी काय केलं पाहिजे, ही खूणगाठ त्यांनी काय मनाशी बांधली. शरद पवार यांचे जसे सर्वंच राजकीय पक्षातील नेत्यांशी चांगले संबंध आहेत, तसेच चांगले संबंध आनंदभाईंनी ठेवले आहेत. प्रश्नाच्या मुळाशी जाऊन त्याला हात घालायचा आणि प्रश्न सुटेपर्यंत त्याचा पाठपुरावा करायचा, या त्यांच्या वृत्तीमुळं अनेक प्रश्न सुटण्यास मदत झाली.
आनंदभाई हे कठोर तितकेच हळवे राजकारणी आहेत. एखाद्या नेत्याच्या घरापुढं किती चपला आहेत, यावरून नेत्याची लोकप्रियता कळत असते, आनंदभाईंच्या घरीही असंच वातावरण असतं. त्यांच्याभोवती कायम माणसाचं मोहोळ असतं. मधमाशा जशा मोहळाभोवती आकर्षित होत असतात, तसंच लोक आनंदभाईकडं या ना त्या कारणानं कायम आकर्षित होत असतात.

आनंदभाईंनी कायम पालघर जिल्ह्याचा विकासाचा विचार केला. पश्चिमेकडं वाहून जाणारं पाणी पालघर जिल्ह्यातील तहानलेल्या भागांना आणि समुद्रकिनाऱ्यावरच्या काही गावांना मिळालं पाहिजे, ही दूरदृष्टी ठेवून त्यांनी त्यांच्या विधान परिषदेच्या कार्यकाळात सूर्या नदीचं पाणी वळवलं. योजना सुरू करण्यात आणि त्यांना त्यासाठी निधी मिळवण्यात बराच संघर्ष करावा लागला, तरी त्यांनी तो केला. अजित पवार, गणेश नाईक, बाळासाहेब थोरात आदी मंत्र्यांनी त्यांचं काम गांभीर्यानं घेतलं आणि योजनेला मान्यता मिळाली. अजूनही ही योजना पूर्णत्वाला गेली नाही, याची त्यांना खंत आहे; परंतु त्यांनी पाठपुरावा सोडलेला नाही. शरद पवार यांच्यासारखं व्हिजन आनंदभाई पालघर जिल्ह्याच्या बाबतीत दाखवतात. विधान परिषदेचे सदस्य असताना त्यांनी पालघर जिल्ह्याच्या विभाजनाचा विषय लावून धरला. विधान परिषदेचे तत्कालीन सभापती शिवाजीराव देशमुख यांनी आपल्या दालनात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अजित पवार, बाळासाहेब थोरात आदींची बैठक घेतली आणि पालघर जिल्ह्याच्या विभाजनाचा प्रश्न कसा मार्गी लावता येईल, याचा विचार-विनिमय करून त्याबाबतचा आदेश काढला. त्यामुळं ज्या मोजक्या नेत्यांनी पालघर जिल्ह्याच्या विभाजनासाठी काम केलं, त्यात आनंदभाई होते, हे विसरून चालणार नाही. पालघर जिल्ह्याच्या निर्मितीचा शिल्पकार म्हटलं तरी त्यात वावगं काहीच नाही. रंजल्या गांजलेल्यांची सेवा करणं हा महात्मा गांधींनी दिलेला विचार आनंदभाईंनी आपल्या वेगवेगळ्या शैक्षणिक संकुलाच्या माध्यमातून प्रत्यक्षात आणला आहे. पालघर हा आदिवासी जिल्हा आणि या आदिवासी जिल्ह्यातील मुलं शिकली पाहिजेत, मोठी झाली पाहिजेत हा त्यांचा दृष्टिकोन. त्यांच्या आठ शाळा, दोन कनिष्ठ महाविद्यालय, इंग्रजी माध्यमाची एक शाळा, वसतिगृह आदी ठिकाणी सुमारे दहा हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शिक्षणाच्या प्रवाहातून आदिवासी मुलं शिकली पाहिजेत, त्यांना रोजगार मिळाला पाहिजे, यावर त्यांचा भर असतो. केवळ राजकीय प्रश्न मांडून चालत नाही, तर जिल्ह्याच्या विकासाचा एक सर्वांगीण दृष्टिकोन मांडावा लागतो. तो आनंदभाई मांडतात. जिल्ह्याला एक कुटुंब मानून कुटुंब प्रमुख या नात्यानं जिल्ह्यातील प्रश्न सुटले पाहिजेत, यासाठी त्यांचा कायम पाठपुरावा सुरू असतो.

आनंदभाई ज्या परिसरातून आले, तो परिसर डाव्यांचा बालेकिल्ला. तिथं काँग्रेसची पाळंमुळं रोवणं कठीण. अशा काळात युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदापासून त्यांनी युवक काँग्रेसच्या माध्यमातून संघटन केलं. तत्कालीन ठाणे जिल्ह्याचे प्रमुख सांभाळताना त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची पाळंमुळं ग्रामीण भागात रुजवली. त्याचा फायदा तत्कालीन ठाणे जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार वाढवण्यात झाला. गणेश नाईक ठाणे जिल्ह्याचे दहा वर्षे पालकमंत्री असताना त्यांच्या माध्यमातून पालघर जिल्ह्यातील विविध प्रश्न सोडवण्यात त्यांना यश आलं. आताही नाईक हेच पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत आणि आनंदभाईंशी त्यांचा असलेला संपर्क आणि अतिशय जिव्हाळ्याचे संबंध लक्षात घेता पालघर जिल्ह्यातील विविध प्रश्न सोडवण्यासाठी त्याचा उपयोग होत आहे. आनंदभाईंचं राजकारण सुरू होऊन आता चार दशकं झाली आहेत. या चार दशकात त्यांनी विविध पदं भूषवली. युवक काँग्रेसच्या तालुका अध्यक्षपदापासून सुरू केलेली वाटचाल नंतर वेगवेगळ्या संघटनात्मक कामातून सुरू राहिली. त्यांनी कायम सत्तेचं विकेंद्रीकरण करण्यावर भर दिला. पदं मिळवण्यासाठी लोक किती प्रयत्न करतात, हे सर्वज्ञात आहे; परंतु पद नाकारण्यात एक मोठं मन लागतं. ते आनंदभाईंकडं आहे. डहाणूच्या बँकेसाठी पूर्वीचे सत्ताधारी आणि आत्ताचे विरोधक अशा सर्वांना एकत्र आणून एक नवा पायंडा त्यांनी पाडला. आर्थिक संस्थेत राजकारण नको, ही त्यांची भूमिका. खरंतर गेली काही वर्ष डहाणू बँकेवर त्यांचं वर्चस्व असताना त्यांनी या वेळी इतरांना उमेदवारी देऊन स्वतः मात्र मागं राहिले. डहाणू, तलासरी, विक्रमगड या तालुक्यावर कायम डाव्यांचं वर्चस्व होतं. कष्टकरी संघटनेचं नेतृत्व तिथं होतं, या लाल किल्ल्यात राष्ट्रवादी काँग्रेसला रुजवण्यात त्यांचं मोठं योगदान आहे. स्थानिक स्वराज्य संस्था, ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, ठाणे जिल्हा मजूर फेडरेशन, ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँक, कृषी समन्वयक आणि अनेक शासकीय महामंडळावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची, कार्यकर्त्यांची वर्णी लागली. त्याचं मुख्य कारण आनंदभाई हेच आहेत. कोकण पाटबंधारे महामंडळाचे उपाध्यक्ष असताना पालघर जिल्ह्याला सूर्या प्रकल्पाचं पाणी मिळवण्यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांना लोक विसरलेले नाहीत. डहाणू तालुक्यातून जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडणूक लढवत त्यांनी १९९२ मध्ये आपल्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात केली. त्यानंतर जिल्हा परिषद उपाध्यक्ष असताना त्यांनी जिल्ह्याची अनेक विधायकं काम मार्गी लावली, तर कोकण पाटबंधारे महामंडळाचे उपाध्यक्ष असताना त्यांनी सूर्या प्रकल्पाचं पाणी वळवण्याच्या क्रांतिकारी योजनेचा श्री गणेशा केला. नवनीत विकास मंडळाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी केलेली कामंही सामान्यांच्या लक्षात आहेत. सत्येंद्रभाई ट्रस्ट, वाचनालय, व्यायाम शाळा आदी अनेक पदावर त्यांनी काम केलं. ठाणे जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ, वाणगाव एज्युकेशन सोसायटी, आश्रम शाळा, स्थापना करून त्यावरही त्यांनी वेगवेगळ्या पदावर काम केलं आणि लोकसेवेचा वसा पुढं कायम ठेवला. आजही ते पालघर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, वाणगाव सहकारी संस्थेचे अध्यक्ष, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपाध्यक्ष, भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे सदस्य आदी पदावर कार्यरत आहेत. राजकारण ही केवळ सत्ता मिळवण्याची शर्यत नसून, ती समाजसेवेची एक व्यापक प्रक्रिया आहे, यावर त्यांचा विश्वास आहे आणि या विश्वासावर त्याची वाटचाल चालू आहे. त्यांनी कधी जात, धर्म, प्रांत आदींचा विचार न करता प्रत्येक गरजू व्यक्तीला मदतीचा हात दिला. संकटात धावून जाणारा आणि आनंदाच्या क्षणी भागीदार होणारा हा नेता पालघरचा आहे, याचा प्रत्येकाला अभिमान आहे.
आनंदभाई यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात सर्वसामान्य लोकांच्या प्रश्नांपासून केली. त्यांनी नेहमीच जनतेशी नाळ जोडून ठेवत विकासाभिमुख राजकारणावर भर दिला. ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागांमध्ये त्यांनी पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य आणि रोजगार या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. सध्या ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजीत पवार गट) चे पालघर जिल्हाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. या जबाबदारीत त्यांनी पक्ष संघटन मजबूत करण्यावर आणि तरुण कार्यकर्त्यांना संधी देण्यावर विशेष भर दिला आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली पक्षानं पालघर जिल्ह्यात प्रभावीपणे जनसंपर्क वाढवला असून विविध सामाजिक प्रश्नांवर ठोस भूमिका घेतली आहे. राजकारणाबरोबरच समाजसेवा ही त्यांच्या जीवनाची महत्त्वाची बाजू आहे. गरजूंसाठी आरोग्य शिबिरं, विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत, आपत्तीच्या काळात मदतकार्य, तसेच महिला व युवक सक्षमीकरणासाठी विविध उपक्रम त्यांनी राबवले आहेत. या कामांमुळं त्यांनी समाजात सकारात्मक बदल घडवून आणला आहे. आनंदभाई यांची विकासाची दृष्टी सर्वसमावेशक आहे. ते केवळ मोठ्या प्रकल्पांवरच नाही, तर छोट्या-छोट्या स्थानिक समस्यांवरही लक्ष केंद्रित करतात. रस्ते, पाणीपुरवठा, सार्वजनिक सुविधा आणि पर्यावरण संवर्धन या क्षेत्रात त्यांनी सातत्यानं प्रयत्न केले आहेत. आनंदभाई हे केवळ एक राजकारणी नसून जनतेचा विश्वास संपादन करणारे लोकनेते आहेत. त्यांची कार्यशैली, साधेपणा आणि समाजासाठीची निष्ठा यामुळे ते पालघर जिल्ह्यात एक आदर्श नेतृत्व म्हणून ओळखले जातात. त्यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! त्यांच्या पुढील वाटचालीसाठी उत्तम आरोग्य, यश आणि समाजसेवेची अखंड प्रेरणा लाभो हीच शुभेच्छा!


















