मुंबईतील प्रवास सुखद आणि वाहतूक कोंडीमुक्त करण्यासाठी वांद्रे कुर्ला संकुलात पॉड टॅक्सी सुरु करण्यासाठी महत्त्वाची पावले उचलली जात आहेत. राज्य सरकार बीकेसी नंतर पॉड टॅक्सी नेटवर्कचा विस्तार करणार आहे.
मुंबईसह ठाणे, मिरा भाईंदरमध्येही पॉड टॅक्सी धावणार आहे. पॉड टॅक्सी लहान असल्यामुळे वर्दळ आणि वाहतूक कोंडी असलेल्या शहरांमध्ये ही फायदेशीर ठरू शकते. त्यामुळे पहिल्यांदा या तीन ठिकाणांची निवड करण्यात आली आहे.
MMRDAसोबत प्रकल्प
मुंबई व उपनगरात हळूहळू पॉड टॅक्सीला फर्स्ट व लास्ट माइल कनेकटीव्हीटी साठी प्राधान्य दिलं जाणार आहे. हा प्रकल्प सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्त्वावर राबवले जाणार आहे. राज्य सरकार एमएमआरडीए सोबत मिळून या प्रकल्पाचं काम करणार आहे. MMRDA ही नोडल एजन्सी असेल. सध्या सविस्तर प्रकल्प अहवाल अंतिम टप्प्यात असून त्यावरून अभ्यास करून ठाणे आणि मिरा भाईंदर परिसरात पॉड टॅक्सी प्रकल्पाची व्यवहार्यता तपासली जाणार आहे.
या अहवालात ठाणे शहरात 43.5 किमी लांब पॉड टॅक्सी नेटवर्क प्रस्तावित आहे. त्याशिवाय मिरा भाईंदरमध्ये 32.5 किमी लांब नेटवर्क तयार करण्याचा प्रस्ताव मांडला गेला आहे. टप्प्याटप्प्याने या प्रकल्पांचे काम केले जाणार आहे. प्रत्येक 1 किमी अंतरावर पॉड टॅक्सीचे स्थानकं प्रस्तावित आहेत. त्याशिवाय नव्या मेट्रो मार्गांशी हे स्थानकं जोडलेले असतील.
‘मेट्रो’ला जोडणार
ठाणे महापालिकेचे आयुक्त सौरभ राव म्हणाले, “या मार्गाच्या व्यवहार्यतेवर गेल्या पाच महिन्यांपासून चर्चा सुरू आहे.” “ठाणे रिंग मेट्रोसह सुमारे 30 किमी मेट्रो लाइन येत आहे, आम्हाला हे सुनिश्चित करायचे आहे की पीआरटीचा मार्ग एकत्रपणे नेटवर्क तयार करेल. पुढील दोन आठवड्यांत मार्ग आणि आर्थिक मॉडेलवर औपचारिक निर्णय घेतला जाईल.” त्याशिवाय मीरा भाईंदर महापालिकेचे आयुक्त राधाबिनोद शर्मा यांनी सांगितले की, डीपीआर तयार झाल्यानंतर एमएमआरडीएकडे अंमलबजावणीसाठी प्रस्ताव पाठविला जाणार आहे.
स्थानकं कुठे असतील?
ठाणे पॉड टॅक्सी शहरातील माजिवाडा, विवियाना/लेक शोअर मॉल, मानपाडा, हिरानंदानी इस्टेट, कासाररवडवली, तीन हात नाका आणि शास्त्री नगर या महत्त्वपूर्ण ठिकाणांना जोडणार आहे. या प्रकल्पासाठी एकूण 2.806 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. या 43.5 किमी मार्गावर तब्बल 72 स्थानकं असतील. त्यामुळे ठाण्यातील वाहतूक कोंडीला उतारा मिळणार आहे.
दरम्यान, मिरा भाईंदरमध्ये पॉड टॅक्सीचे एकूण 29 स्थानकं असतील. या 32.5 किमी लांब नेटवर्कसाठी 2,256 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. हा मार्ग मिरा रोड, भाईंदर, काशीमिरा, गोल्डन नेस्ट सर्कल, शांती पार्क, कनकिया आणि इतर रहिवासी ठिकाणांना जोडणार आहे. या पॉड टॅक्सीच्या पहिल्या टप्प्यात 12 – 13 किमी लांब मार्ग विकसित करण्यात येणार आहे. हा टप्पा 2028पर्यंत पूर्ण करण्याचं लक्ष्य आहे.
कशी असेल पॉड टॅक्सी?
ही पॉड टॅक्सी एलिव्हेटेड मार्गावर धावणार आङे. प्रत्येक टॅक्सीमध्ये सेल्फ-स्टिअरिंर प्रणाली असेल, त्यामुळे ड्रायव्हर-विना ही टॅक्सी धावणार आहे. प्रत्येक पॉड-कारमध्ये 16 ते 20 प्रवाशांना पोहोचवण्याची क्षमता आहे. या टॅक्सीमध्ये 8 प्रवासी बसून तर इतर प्रवासी उभं राहून प्रवास करू शकतात. ही टॅक्सी ताशी 60 ते 70 किमी वेगाने प्रवास करेल. प्रत्येक दिशेने तासाला हजारो प्रवासी प्रवास करू शकतात. सध्या भाडे दर प्रत्येकी 8 ते 10 रुपये असण्याची शक्यता आहे.

















zzlWzi8qqy8Un4Ec/s320/1001506655.jpg