वाढती महागाई, आर्थिक ओढाताण आणि खर्च वाढल्याने सलून व्यावसायिकांची अडचण होत आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नाभिक महामंडळाने राज्यातील ग्रामीण आणि शहरातील भागातील सलून सेवांच्या दरात २० टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
ही दरवाढ 6 जूनपासून लागू करण्यात आली. याविषयी महामंडळाचे प्रदेशाध्यक्ष सयाजी झुंजार यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे माहिती दिली आहे. मागील काही महिन्यांपासून जागतिक स्तरावर झालेल्या अस्थिर परिस्थितीचा फटका सर्वसामान्यांसह लहान व्यावसायिकांनाही बसत आहे. इंधन दरवाढीमुळे विविध वस्तूंचे दर वाढलेले आहेत, असं प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे.
सलून व्यवसायासाठी लागणारे शॅम्पू, हेअर कलर, ब्लीच, फेशिअल क्रिम, जेल, वॅक्स, डिस्पोजेबल वस्तू, टॉवेल धुण्याचे साहित्य, निर्जंतुकीकरणासाठी लागणारे साहित्य व अन्य अनेक वस्तू पेट्रो केमिकल्स उद्योगाशी संबंधित आहे. परिणामी इंधन दरवाढीचा थेट परिणाम या वस्तूंवर झाला आहे. या वस्तू उत्पादित करणाऱ्या अनेक देशी -विदेशी कंपन्यांनी दरवाढ केली आहे, असं पत्रकात म्हटलं आहे.
प्रयत्न करुनही सलून व्यावसायिकांना आता जुने दर ठेवणे अवघड झाले आहे. वाढत्या महागाईचा फटका सलून व्यावसायिकांनाही बसत आहे. या बाबी पाहून सलून सेवांच्या दरात २० टक्के वाढ केल्याचे प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. राज्यातील लाखो नाभिक कुटुंबांचे भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी व्यवसाय जिवंत ठेवण्यासाठी ग्राहकांनी आम्हाला सहकार्य करावे, असे आवाहन महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे प्रदेशाध्यक्ष सयाजी झुंजार, उपाध्यक्ष विष्णू वखरे, कार्याध्यक्ष श्याम आस्करकर, सरचिटणीस घनश्याम वाघ, कोषाध्यक्ष रामदास पवार, चिटणीस विकास मदने आदींनी केले आहे.
दुसरीकडे महागाई, इंधन दरवाढ विरोधात ठाकरे गटाचं जनआक्रोश आंदोलन
दरम्यान, महागाई, इंधन दरवाढीविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे रविवारी आंदोलन करण्यात आले. इंधन दरवाढ रद्द झालीच पाहिजे, मोदी सरकारचे करायचे काय, वारे मोदी तेरा खेल, सस्ती दारू महेंगा तेल, महागाई हटाव, मोदी हटाव, अशा घोषणांनी क्रांती चौक परिसर दणाणून गेला. महिलांनी गॅस सिलिंडरला हळदीकुंकू वाहून त्याचे पुजन केले, तर राज्य सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी फसवी असल्याचा आरोप करत शासन निर्णयाची होळी करून निषेध करण्यात आला.
पक्षाच्या वतीने केंद्र सरकारने केलेली इंधन दरवाढ, वाढलेली महागाई विरोधात क्रांतीचौक येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर ‘महंगाई के अच्छे दिन’ जनआक्रोश आंदोलन केले. शिवसेना नेते, आमदार अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली सुरुवातीला सायकवरून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास फेरी मारण्यात आली. त्यानंतर शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली.
महागाई रद्द झालीच पाहिजे, मोदी सरकारचे करायचे काय, खाली मुंडके वर पाय अशा घोषणा दिल्या. सिलिंडर समोर ठेऊन महिलांनी लाटण्यांनी थाळ्या वाजवल्या. त्यानंतर डिजेवर महागाईचे गाणे टाळांच्या गजरात वाजवले. महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलन स्थळी सिलिंडरला हळदी-कुंकू व फुले वाहून सिलिंडरला ओवाळून त्याचे पुजन करत गॅस दरवाढीचा निषेध केला.
राज्य शासनाने काढलेल्या कर्जमाफीच्या शासन निर्णयाची होळी केली. फसवी कर्जमाफी करण्यात आली असून ही तर कर्जवसूलीसाठीचा शासन निर्णय आहे, असा आरोप करण्यात आला. फसवी कर्जमाफी रद्द करा, शेतकर्यांना कर्जमुक्त करा, सातबारा कोरा करा या घोषणा देण्यात आल्या.


















zzlWzi8qqy8Un4Ec/s320/1001506655.jpg