विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे तीन आमदार थेट भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या भेटीसाठी सोलापुरात पोहोचल्याने राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्कांना सुरुवात झाली आहे.
भेटीसाठी राष्ट्रवादीचे माळशिरसचे आमदार उत्तम जानकर, माढ्याचे आमदार अभिजीत पाटील आणि करमाळ्याचे आमदार नारायण पाटील उपस्थित होते. विशेष म्हणजे उत्तम जानकर हे शरद पवार यांचे निकटवर्तीय आणि विश्वासू सहकारी मानले जातात. त्यामुळे त्यांच्या या भेटीकडे विशेष लक्ष लागले आहे.
सोलापुरात आज विधान परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने महायुतीच्या स्थानिक नेत्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीसाठी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे उपस्थित आहेत. मात्र बैठकीपूर्वीच विरोधी पक्षातील आमदारांनी घेतलेली भेट राजकीयदृष्ट्या महत्त्वाची मानली जात आहे.
राष्ट्रवादीसमोर आव्हान?
विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर पक्षांतर्गत नाराजी उफाळून आल्याचे चित्र दिसत आहे. या नाराजीचा परिणाम मतदानावर होण्याची शक्यता राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत. त्यामुळे सोलापूरच्या निवडणुकीत राष्ट्रवादी (शरद पवार गट) ला अंतर्गत असंतोषाचा फटका बसतो का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, या भेटीबाबत संबंधित आमदारांकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नसून, आगामी काही दिवसांत या घडामोडींमागील नेमके कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे.


















zzlWzi8qqy8Un4Ec/s320/1001506655.jpg