महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सुमारे ८६ हजार कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांना दिलासा देणारा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. एसटी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे ५३ टक्क्यांवरून ५८ टक्क्यांपर्यंत देणार असल्याची घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली आहे.
यासोबतच कर्मचाऱ्यांच्या घरभाडे भत्त्यातदेखील वाढ करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली आहे.
मुंबई सेंट्रल येथील ‘वाहतूक भवन’ या महामंडळाच्या मुख्यालयात आज गुरुवारी (दि. ११ जून) राज्य परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत बैठक घेण्यात आली. या बैठकीत त्यांनी हे महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर केले. यावेळी विविध कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींनी मांडलेल्या आर्थिक व प्रशासकीय मागण्यांवर सकारात्मक आणि सविस्तर चर्चा झाल्याचे सरनाईक यांनी सांगितले.
या बैठकीच्या सुरुवातीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दूरध्वनीवरून सर्व कर्मचारी संघटनांना शुभेच्छा दिल्या. “सामंजस्याची भूमिका घेऊन महामंडळ अधिक सक्षम करण्यासाठी सर्वांनी एकत्र काम करावे,” असे आवाहन त्यांनी केले.
भविष्यात राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता लागू होताच तो तत्काळ प्रभावाने एसटी कर्मचाऱ्यांनाही लागू करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. तसेच वेतनवाढीची थकबाकीही आर्थिक परिस्थितीचा विचार करून टप्प्याटप्प्याने अदा केली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या बैठकीत कर्मचाऱ्यांचे वेतन, भत्ते, सेवाशर्ती, रिक्त पदभरती, बसस्थानक विकास, कल्याणकारी योजना तसेच महामंडळाच्या कार्यक्षमतेत वाढ करण्यासंदर्भातील विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. यावेळी एसटी कर्मचाऱ्यांच्या न्याय्य मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेणार असल्याची ग्वाही दिली. त्यावर आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आल्याचे सरनाईक यांनी म्हटले आहे.


















zzlWzi8qqy8Un4Ec/s320/1001506655.jpg