पालघर-योगेश चांदेकर
पालघरः ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत सामाजिक कार्यकर्ते नीलेश सांबरे यांनी सहकार व परिवर्तन या दोन्ही पॅनेलकडे उमेदवारी मागितली होती; परंतु त्यांना उमेदवारी नाकारण्यात आल्याने आता त्यांनी बंडाचे निशाण फडकवले असून विक्रमगड विविध कार्यकारी सहकारी संस्था गटातून उमेदवारी कायम ठेवली आहे. ‘ठाणे जिल्हा बँक बचाव, मेगासॉफ्ट हटाव’ अशी भूमिका त्यांनी घेतली असून संचालक मंडळावर तसेच आर्थिक गैरव्यवहाराचे विविध आरोप त्यांनी केले आहेत.
ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक सध्या चांगलीच गाजत आहे. या बँकेच्या निवडणुकीत दोन पॅनल रिंगणात आहेत. २७ जूनला निवडणूक होणार असून संचालक मंडळाच्या २१ जागांपैकी दहा उमेदवारांची निवडणूक बिनविरोध झाली असल्याने आता अकरा जागांसाठी निवडणूक होत आहे. त्यात पालघर जिल्ह्यातील जागांसाठी प्रामुख्याने निवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी सहकार किंवा परिवर्तन या दोन पैकी कोणत्याही पॅनेलने उमेदवारी द्यावी, अशी सांबरे यांची मागणी होती. त्यासाठी त्यांनी विविध नेत्यांची चर्चा केली. भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के, भाजपचे आमदार किसन कथोरे, हितेंद्र ठाकूर यांच्याशी त्यांनी चर्चा केली होती. सांबरे यांनी त्यासाठी मंगळवारी आपली भूमिका समाज माध्यमातून जाहीर केली होती. त्यात ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसाठी यापूर्वी आपण गेल्या वीस वर्षात संचालक मंडळाला कशी मदत केली, याचा पाढा त्यांनी वाचला होता.
सामाजिक कामाचा वाचला पाढा
दोन्हीपैकी कोणीही त्याना उमेदवारी दिली, तरी आपण बँकेसाठी काय करणार आहोत, हेही त्यांनी सांगितले होते; परंतु आज प्रत्यक्षात जेव्हा उमेदवारांची यादी जाहीर झाली, तेव्हा सांबरे यांना कोणत्याही पॅनेलने उमेदवारी दिली नाही. त्यामुळे अखेर त्यांनी विक्रमगड तालुक्यातील विविध कार्यकारी सहकारी संस्था गटातून आपली उमेदवारी कायम राहणार असल्याचे सांगत बंडाचे निशाण फडकवले. जिजाऊ संस्थेमार्फत कोकण विभागात स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुरू असलेल्या अभ्यासिका, ‘सीबीएससी’च्या शाळा, महिला सक्षमीकरणासाठी सुरू असलेले विविध उपक्रम, आरोग्यासाठी राबवले जात असलेले विविध उपक्रम कोकण तसेच सातारा जिल्ह्यात सुरू असलेले सामाजिक उपक्रम त्याचा आढावा घेतला होता.
पितळ उघडे पडण्याच्या भीतीने विरोध
समाजकार्याची दखल घेऊन उमेदवारी मिळावी, अशी अपेक्षा सांबरे यांनी व्यक्त केली होती. त्याचबरोबर मला विरोध का, हे कुणी सांगितले, तर मी माघार घेईल असे त्यांनी स्पष्ट केले होते; परंतु त्यांचे आव्हान कुणीच स्वीकारले नाही. त्यामुळे अखेर सांबरे यांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेताना संचालक मंडळावर विविध आरोप केले. सांबरे म्हणाले, की रवींद्र चव्हाण, किसन कथोरे, हितेंद्र ठाकूर, नरेश मस्के आदी सर्वच नेत्यांची मला उमेदवारी देण्याची तयारी होती. बँकेच्या निवडणुकीत पक्षविरहीत पॅनेल असल्याने कोणाचीही उमेदवारी घेण्याची माझी तयारी होती; परंतु बँकेच्या संचालकांनी मला विरोध केला. त्याचे कारण मी निवडून गेलो, तर संचालक मंडळांनी केलेल्या गैरकारभारावर प्रकाश पडेल आणि त्यांचे पितळ उघडे पडेल. यामुळे त्यांनी मला विरोध केला, असा आरोप त्यांनी केला.
‘मेगासॉफ्ट’कडून तिप्पट दराने खरेदी
ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत मेगासॉफ्ट आणि या कंपनीशी संलग्न पाच कंपन्यांकडून तिप्पट दराने संगणकासह अन्य खरेदी केली जात असून जादा दराने खरेदी केलेले पैसे संचालक मंडळांना पोहोच केले जातात, असा गंभीर आरोप सांबरे यांनी केला. ‘मेगासॉफ्ट हटाव, बँक बचाव’ अशी मोहीम आपण हाती घेतली आहे, असे ते म्हणाले. ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत आजोबा, वडील आणि आता त्यांची मुले संचालक आहेत. ‘अनुकंपा तत्त्वावर संचालक’ हा आगळावेगळा पॅटर्न येथे असल्याची टीका करून ते म्हणाले, की संचालक मंडळातील अनेकांना कोणताही व्यवसाय नाही. ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेतील आर्थिक गैरव्यवहारावरच त्यांचा उदरनिर्वाह चालू असतो.
कर्मचाऱ्यांकडूनही वसुली!
कर्मचारी भरती कर्मचाऱ्यांना पैसे, पदोन्नती तसेच कर्मचाऱ्यांचा बोनस आदी सर्व ठिकाणी त्यांचे हप्ते ठरलेले आहेत. त्यामुळे त्यांचा गैरव्यवहार मी उघडकीस आणण्याची त्यांना भीती वाटत असल्याने त्यांनी मला विरोध केला; परंतु ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे भागधारक, कर्मचाऱ्यांच्या जीवावर ही बँक उभी आहे. भागधारक आणि कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी मी बँकेच्या निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतला. विक्रमगड विविध कार्यकारी सहकारी संस्था मतदारसंघातून माझी उमेदवारी असून भागधारक आणि कर्मचाऱ्यांनी दोन-दोन मते जरी मला मिळवून दिली, तरी मी सहज निवडून येऊ शकेल. बँक वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांनी भागधारकांनी मला मदत करावी, असे आवाहन निलेश सांबरे यांनी केले आहे.
कोट
‘ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत मी भागधारक, कर्मचारी, ठेवीदार, कर्जदार यांच्या हितासाठी उभा आहे. बँकेत कोणताही गैरव्यवहार होऊ देणार नाही तसेच बँकेत पैसे कमवण्यासाठी मी जात नाही. कोणत्याही सहकारी संस्थेच्या संचालकाने किंवा अन्य पदाधिकाऱ्याने कोणतेही मानधन अथवा अन्य लाभ न घेता काम केले पाहिजे, अशी माझी भूमिका आहे. जिल्हा परिषदेचा उपाध्यक्ष असतानाही मी कोणतेही मानधन किंवा वाहन भत्ता घेतला नाही. जव्हार बँकेच्या निवडणुकीतही हेच आश्वासन मी दिले होते. आताही त्याच आश्वासनाच्या पुनरुच्चार करीत मी निवडणुकीला सामोरा जात आहे.
नीलेश सांबरे, उमेदवार, ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक


















zzlWzi8qqy8Un4Ec/s320/1001506655.jpg