banner 728x90

शेतकरी कर्जमाफी योजनेतील ‘ती’ महत्वाची अट रद्द, मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा; शेतकऱ्यांना दिलासा

banner 468x60

Share This:

ज्याच्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस होता. या अधिवेशनात विविध मुद्यांवरून सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आल्याचे पाहायला मिळाले. आज (१० जुलै) अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेला विधानसभेत उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली.

यावेळी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीतील अटीशर्तीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक मोठी घोषणा केली आहे.

आता राज्यातील ज्या शेतकऱ्यांनी महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ घेतलेला आहे, त्या शेतकऱ्यांचं ५० हजारांऐवजी २ लाखांपर्यंतचं कर्ज माफ होणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

“शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्यांवर बरीच चर्चा झाली. कर्जमाफी ही परिस्थितीची आवश्यकता आहे म्हणून आपण करतो. कुठल्याही कर्जमाफीने शेतकरी कधी श्रीमंत झाला नाही किंवा होऊ शकत नाही. मात्र, त्या-त्यावेळी शेतकऱ्यांना क्रेडिटवरती बनवायचं, जेणेकरून शेतकऱ्याला सावकाराकडे जावं लागणार नाही, हे त्यामागचं एक उद्दिष्ट असतं. मी पुन्हा एकदा सांगतो की आम्ही विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी शब्द दिला होता की आम्ही कर्जमाफी करू. खरं तर कर्जमाफी देण्यासाठी २०२९ पर्यंत आम्ही थांबू शकलो असतो. कारण आम्ही सर्व निवडणुका जिंकलो आहोत. मात्र, आम्ही तसं केलं नाही. आम्ही ठरवलं की शेतकरी अडचणीत असेल तर शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली पाहिजे. त्यामुळे आपल्या सरकारने कर्जमाफीचा निर्णय घेतला”, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

banner 325x300

कर्जमाफीचा लाभ किती शेतकऱ्यांना मिळणार?

“सरकारने काय काय केलं? तर कर्जमाफीच्या व्यतिरिक्त दरवर्षी २५ हजार कोटी रुपये वीजमाफी सरकार देतं. हे पैसे भरावे लागतात. पहिल्या वर्षी २० हजार कोटी, दुसऱ्या वर्षी २२ हजार कोटी आणि तिसऱ्या वर्षी २५ हजार कोटी रुपये आपण भरतो. आता कर्जमाफीचा निर्णय घेताना सर्व बँकांची बैठक घेतली आणि त्यानंतर ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना’ आपण जाहीर केली. या माध्यमातून ५६ लाख शेतकऱ्यांना ३६ हजार ५८५ कोटींचा लाभ देणारी ही कर्जमाफी योजना आहे”, असंही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीतील कोणती अट रद्द?

“पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेत आपण २ लाखांपेक्षा जास्त ज्यांची बाकी आहे, त्यांनाही २ लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी योजनेचा लाभ देत आहोत. आपल्याला शेतकऱ्यांना कर्जमाफी देत असताना बँकिंग सिस्टिमचाही काही विचार करावा लागतो. आता या कर्जमाफीबाबत खूप अटीशर्ती आहेत, यावरून सवाल विचारले गेले. काही आमदार मला भेटले आणि म्हणाले की शेतकरी कर्जमाफीतील ५० हजारांची ती अट काढून टाका. तेव्हा मी त्यांना सांगितलं की जर ही अट काढली तर सरकारला ३ ते ४ हजार कोटींचा भुर्दंड येईल. ही अट एक शिस्तीचा भाग म्हणून आपण ठेवली होती”, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

“आता ज्या शेतकऱ्यांनी महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ घेतलेला आहे, त्यांना आपण ५० हजार रुपयांची अट घातली होती. त्या माध्यमातून ५० हजार रुपयांपर्यंत कर्जमाफी आपण म्हटलं होतं. मात्र, आता महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांनाही थेट २ लाखांपर्यंत कर्जमाफी मिळेल. त्याचबरोबर २०२६-२७ चा कर्ज भरण्याच्या संदर्भातील नियम वगळण्यात येईल. म्हणजे २०२६ ला किती लोकांनी कर्ज भरलं, तर ९५ टक्के लोकांनी भरलं. त्या आधीच्या तीन पैकी दोन वर्षात ज्यांनी पैसे भरले ते देखील आता पात्र होतील”, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत बोलताना दिली आहे.

banner 468x60

banner 468x60

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!