banner 728x90

तरुणाईच्या कल्पकतेतून साकारली हरिश्चंद्रगडावरील केदारेश्वर मंदिराची प्रतिकृती

banner 468x60

Share This:

पालघर-योगेश चांदेकर

आसनगावच्या सूर्यवंशी क्षत्रिय कुणबी समाज गणेशोत्सव मंडळाचा देखावा

banner 325x300

पालघर: डहाणू तालुक्यातील आसनगाव येथील सूर्यवंशी क्षत्रिय कुणबी समाज गणेशोत्सव मंडळाच्या वतीने यंदाच्या गणेशोत्सवानिमित्त हरिश्चंद्रगडावरील प्रसिद्ध केदारेश्वर मंदिराची हुबेहूब प्रतिकृती साकारण्यात आली आहे. आकर्षक सजावटीच्या माध्यमातून गणेशभक्तांना महाराष्ट्राच्या ऐतिहासिक आणि धार्मिक वारशाची ओळख करून देण्याचा अनोखा प्रयत्न मंडळाने केला आहे. त्यामुळे ही प्रतिकृती परिसरातील गणेशभक्तांचे विशेष आकर्षण ठरत आहे.
केदारेश्वर मंदिराची प्रतिकृती साकारण्यासाठी मंडळातील तरुणांनी विशेष पुढाकार घेतला. मेहनत, कल्पकता आणि कलाकौशल्याचा वापर करून त्यांनी मंदिराच्या गुहेचे वातावरण प्रतिकृतीच्या माध्यमातून उभे केले आहे. दगडी रचना, खांब, गुहेतील वातावरण, पाण्याने वेढलेले शिवलिंग आणि धार्मिक परिसराची अनुभूती यांचा सजावटीमध्ये बारकाईने समावेश करण्यात आला आहे. गणेशोत्सवाच्या माध्यमातून केवळ धार्मिक वातावरण निर्माण न करता महाराष्ट्रातील ऐतिहासिक स्थळांची माहिती नागरिकांना आणि विशेषतः नव्या पिढीला व्हावी, हा मंडळाचा उद्देश आहे.

केदारेश्वर मंदिराचे वैशिष्ट्य
हरिश्चंद्रगडावरील केदारेश्वर मंदिर हे धार्मिक आणि ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचे ठिकाण मानले जाते. गुहेच्या मध्यभागी असलेले भव्य शिवलिंग हे मंदिराचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. वर्षातील बहुतांश काळ हे शिवलिंग थंडगार पाण्याने वेढलेले असते. धार्मिक परंपरेनुसार शिवलिंगाला पूर्वी चार दगडी आधारस्तंभ होते. हे चार स्तंभ सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुगाचे प्रतीक मानले जातात. सध्या त्यापैकी एकच स्तंभ उभा असल्याचे सांगितले जाते. याच वैशिष्ट्यपूर्ण रचनेची अनुभूती गणेशभक्तांना प्रतिकृतीच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

अनेकांचा सहभाग
ही प्रतिकृती साकारण्यासाठी राहेश पाटील, रिद्धेश पाटील, मानसी पाटील, साक्षी पाटील, ईशा कोरे, हर्सूल पाटील, हर्ष पाटील, श्रुती पाटील, श्रेया पाटील, हितेंद्र पाटील, आशिष पाटील यांच्यासह मंडळातील इतर सदस्यांनी परिश्रम घेतले. तरुणाईच्या कल्पकतेला सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमाची जोड देत मंडळाने साकारलेली ही सजावट गणेशभक्तांचे लक्ष वेधून घेत आहे.

धार्मिकतेसोबत वारसा जपण्याचा संदेश
गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव न राहता सामाजिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचे माध्यम ठरावा, असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला आहे. महाराष्ट्रातील गड-किल्ले, मंदिरे आणि ऐतिहासिक स्थळांची माहिती आकर्षक सजावटीच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा मंडळाचा प्रयत्न कौतुकास्पद ठरत आहे.

banner 468x60

banner 468x60

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!