पालघर-योगेश चांदेकर
पालघर: कथीत सेवा आश्रम शिक्षण संस्था संचलित बोईसर येथील सेवा आश्रम विद्यालयातील विविध विकासकामांसाठी कंत्राटदारांना मंजूर करण्यात आलेल्या रकमेपेक्षा अधिक रक्कम अदा करण्यासाठी दबाव टाकण्यात आल्याचा गंभीर आरोप मुख्याध्यापकांनी केला आहे. या प्रकरणी सहाय्यक धर्मादाय आयुक्तांकडे तक्रार दाखल करण्यात आली असून संबंधित व्यवहारांची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
मुख्याध्यापकांनी दिलेल्या तक्रारीनुसार, एप्रिल ते जून २०२४ या कालावधीत शाळेतील विविध भौतिक सुविधांची कामे करण्यात आली. यामध्ये लोखंडी गेट, पाणी साठवण टाकी, बेंच दुरुस्ती, खिडक्या-दरवाजे, पोषण आहार शेड, कोटा लादी बसविणे आदी कामांचा समावेश होता. ही कामे संबंधित कंत्राटदारांनी पूर्ण केली असून त्यासाठी धनादेशाद्वारे रक्कमही अदा करण्यात आली होती. तक्रारीत म्हटले आहे, की कामे पूर्ण झाल्यानंतर ‘फिट पर्सन’ सुनील भोईर आणि इतरांनी संबंधित कंत्राटदारांना पुन्हा अतिरिक्त धनादेश देण्याचा दबाव आणला. मूळ कामाच्या किंमतीपेक्षा अधिक रक्कम देण्यास सांगण्यात आले. तसे न केल्यास मुख्याध्यापकांची बदली करण्यात येईल, अशी धमकी दिल्याचाही आरोप करण्यात आला आहे.

विरोध डावलून १२ लाखांची अतिरिक्त रक्कम लाटली
मुख्याध्यापकांनी दावा केला आहे, की त्यांच्या विरोधाला न जुमानता एकूण १२ लाख १ हजार १२५ रुपयांचे अतिरिक्त धनादेश विविध कंत्राटदारांच्या नावे देण्यात आले. या रकमेची प्रत्यक्षात आवश्यकता नव्हती आणि संबंधित कामांच्या तुलनेत ती जादा असल्याचे त्यांनी तक्रारीत नमूद केले आहे. तक्रारीसोबत सादर करण्यात आलेल्या तपशीलानुसार, शाळेच्या बँक खात्यांमधून विविध कामांसाठी काढण्यात आलेल्या धनादेशांची यादीही जोडण्यात आली आहे. त्यामध्ये शेड व गेट, खिडक्या-दरवाजे, बेंच दुरुस्ती, पाण्याच्या टाकीचे काम, पोषण आहार शेड तसेच इतर विकासकामांसाठी करण्यात आलेल्या देयकांचा तपशील देण्यात आला आहे. दरम्यान धनादेश काढतांना मुख्याध्यापक व फिटपर्सन पैकी एकाची स्वाक्षरी आवश्यक असतांना फिट पर्सन हे सेवाश्रम शिक्षण संस्था बोईसर असा चुकीचा स्टॅम्प वापरत आहेत.त्यामुळे या संपूर्ण व्यवहाराची चौकशी करून संबंधित आर्थिक व्यवहारांची पडताळणी करावी, जबाबदार व्यक्तींवर योग्य ती कारवाई करावी आणि शाळेच्या निधीचा गैरवापर झाला आहे का, याची तपासणी करावी, अशी मागणी सहाय्यक धर्मादाय आयुक्तांकडे केली होती.

शाळेच्या निधीतून संस्थेच्या ‘स्ट्रक्चरल ऑडिट’चा खर्च
सेवा आश्रम शिक्षण संस्था संचलित बोईसर येथील शाळांच्या निधीतून संस्थेच्या ‘स्ट्रक्चरल ऑडिट’साठी खर्च करण्यात आल्याचा आरोप करत बोईसर येथील सेवा आश्रम विद्यालयाच्या मुख्याध्यापकांनी सहाय्यक धर्मादाय आयुक्तांकडे तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी तक्रारीत करण्यात आली आहे. मुख्याध्यापकांनी दिलेल्या तक्रारीनुसार, सेवा आश्रम शिक्षण संस्था, मुरबे संचलित सेवा आश्रम विद्यालय, सेवा आश्रम प्राथमिक मराठी माध्यम, प्राथमिक इंग्रजी माध्यम तसेच आनंद लक्ष्मण चंदावरकर कनिष्ठ महाविद्यालय या संस्थांच्या ‘स्ट्रक्चरल ऑडिट’साठी ‘फिट पर्सन’ सुनील भोईर आणि इतरांनी खासगी अभियंत्याकडून तपासणी करून घेतली.
शाळेच्या निधीचा गैरवापर
या ‘स्ट्रक्चरल ऑडिट’साठी बोईसर येथील शाळेच्या बँक खात्यातून ८८ हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला; मात्र संस्थेच्या मालमत्तेचे ‘स्ट्रक्चरल ऑडिट’ असताना त्याचा खर्च संस्थेच्या निधीतून न करता शाळेच्या निधीतून करण्यात आल्याचा आरोप मुख्याध्यापकांनी केला आहे. मुख्याध्यापकांच्या मते, संस्थेचा खर्च शाळेवर टाकण्यात आल्याने शाळेच्या निधीचा चुकीचा वापर झाला आहे. या आर्थिक व्यवहाराची सखोल चौकशी करून वस्तुस्थिती समोर आणावी आणि संबंधितांवर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी सहाय्यक धर्मादाय आयुक्तांकडे केली आहे. या तक्रारीची प्रत सेवा आश्रम शिक्षण संस्था, मुरबेचे सदस्य समर्थ एस. वनारसे यांनाही देण्यात आली आहे.


















zzlWzi8qqy8Un4Ec/s320/1001506655.jpg