पर्यावरणवादी आणि शिक्षणतज्ज्ञ सोनम वांगचुक यांनी तब्बल 22 दिवसांपासून सुरू असलेले आमरण उपोषण अखेर सोमवारी मागे घेतले. केंद्रीय आरोग्यमंत्री तथा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी आंदोलनाच्या प्रतिनिधींशी चर्चा केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.
सरकारकडून संवादाची तयारी दर्शवण्यात आल्याने वांगचुक यांनी उपोषण समाप्त करण्याची घोषणा केली.
दिल्लीतील जंतरमंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान प्रकृती खालावल्यामुळे दोन दिवसांपूर्वी दिल्ली पोलिसांनी सोनम वांगचुक यांना सफदरजंग रुग्णालयात दाखल केले होते. दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना रुग्णालयात हलवण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले होते.
सोमवारी संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आंदोलनकर्त्यांनी ‘चलो संसद’ मोर्चा काढला. दिल्ली पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवत अनेक ठिकाणी बॅरिकेड्स उभारले. आंदोलकांनी पोलिसांकडून लाठीचार्ज झाल्याचा आरोप केला मात्र पोलिसांनी हे आरोप फेटाळले.
दरम्यान सरकारकडून चर्चेसाठी पुढाकार घेतल्याची माहिती आंदोलनाच्या प्रतिनिधींनी दिली. केंद्रीय मंत्री जेपी नड्डा यांनी आंदोलनाच्या शिष्टमंडळाशी चर्चा केली. त्यानंतर वांगचुक यांनी उपोषण समाप्त करण्याचा निर्णय घेतला. आंदोलनकर्त्यांनी सांगितले की, सरकारशी संवाद सुरू राहील आणि शिक्षण व्यवस्थेतील प्रश्नांवर तसेच परीक्षा व्यवस्थेतील पारदर्शकतेबाबत पुढील चर्चा केली जाईल.
यापूर्वी सोनम वांगचुक यांनी उपोषण सोडण्यासाठी काही अटी मांडल्या होत्या. शिक्षण व्यवस्थेतील त्रुटींवर सरकारने जबाबदारी स्वीकारावी, संसदेत या विषयावर चर्चा व्हावी आणि राजकीय नेतृत्वाने प्रश्न गांभीर्याने घ्यावा, अशी त्यांची मागणी होती. त्यांच्या पत्नी गीतांजली आंग्मो यांनीही सरकारने सकारात्मक भूमिका घेतल्यास वांगचुक उपोषण सोडतील, असे स्पष्ट केले होते.
गेल्या तीन आठवड्यांपासून सुरू असलेल्या या आंदोलनामुळे देशभरातील विद्यार्थी आणि युवकांमध्ये मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू झाली होती. परीक्षा पेपरफुटीच्या घटनांबाबत उत्तरदायित्व निश्चित करावे, शिक्षण व्यवस्थेत सुधारणा कराव्यात आणि विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित प्रश्नांवर ठोस निर्णय घ्यावेत, या मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले होते.


















zzlWzi8qqy8Un4Ec/s320/1001506655.jpg