banner 728x90

“रास्त भाव धान्य दुकानदारांकडून वसुली होत असल्याची कबुली” संघटनेच्या नावाखाली ‘जिझिया करा’ची वसुली पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांच्या सरबराईसाठी खर्च?

banner 468x60

Share This:

पालघर-योगेश चांदेकर

पालघरः डहाणू तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदारांकडून दर महिन्याला तालुक्यात असणारे प्रति कार्ड प्रमाणे मोठी वसुली केली जात असून या वसुलीचा वापर पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना सांभाळण्यासाठी केला जात आहे? या वृत्ताला आता स्वस्त धान्य दुकानदारांनी दुजोरा दिला आहे? प्रति शिधापत्रिका दोन रुपये दिले नाही, तर वेगवेगळ्या चौकशीच्या नावाखाली छळवणूक केली जात असल्याची तक्रार स्वस्त धान्य दुकानदार खासगीत करीत आहेत.
डहाणू तालुक्यात स्वस्त धान्य दुकानदारांची होत असलेली लूट आणि स्वस्त धान्यात होत असलेला घोटाळा ‘लक्षवेधी’ने उघडकीस आणल्यानंतर आता त्यातील एक एक पैलू बाहेर यायला सुरुवात झाली आहे. स्वस्त धान्य दुकानातील धान्याला कसे पाय फुटतात, याचा पर्दाफाश ‘लक्षवेधी’ने केल्यानंतर आता त्याची चौकशी सुरू झाली असली, तरी ही चौकशी म्हणजे केवळ फार्स ठरू नये अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. त्याचे कारण एकदा चौकशीचे आदेश दिल्यानंतर प्रभारी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी डहाणू तालुक्यातील तहसीलदार, पुरवठा विभागाचे सर्व अधिकारी आता स्वस्त धान्य दुकानातील तक्रारींसंदर्भात काहीही भाष्य करण्यास तयार नाहीत.

banner 325x300

महिन्याकाठी लाखोंची वसुली
स्वस्त धान्य दुकानदारांकडून प्रतिशिधापत्रिका दोन रुपये वसूल केले जातात. डहाणू तालुक्यात २०७ स्वस्त धान्य दुकाने असून त्यातील प्रत्येक शिधापत्रिकेमागे दोन रुपयांचा हिशोब केला, तर वर्षाला दहा लाख रुपये वसूल होतात. एका दुकानात सरासरी ५०० ते १००० शिधापत्रिका आहेत. नरेश धोडी नावाच्या स्वस्त धान्य दुकानदाराने आपण प्रतिशिधापत्रिका दोन रुपये वसूल करीत असल्याचे मान्य केले आहे? त्यांच्याकडे सुमारे ८० दुकाने वसुलीसाठी आहेत. एका स्वस्त धान्य दुकानातून हजार रुपये जरी गृहीत धरले, तर महिन्याला ८० हजार रुपये वसूल होतात.

वसुलीचा हिशेब नाही
या पैशाचे काय होते, ते कुठे जमा केले जातात, त्याचे काही खाते आहे का, त्याचा हिशोब काय याची कोणतीही उत्तरे दिली जात नाहीत. एका स्वस्त धान्य दुकानदाराने तर पुरवठा निरीक्षक तसेच अन्य अधिकारी तपासणीसाठी आले, तर त्यांच्या खाण्यापिण्याची आणि अन्य व्यवस्था करावी लागते आणि त्यासाठीचा खर्च आम्हालाच करावा लागतो, असे सांगितले आहे. त्यामुळे ही रक्कम स्वस्त दुकानदार खिशातून न घालता ती शिधापत्रिकाधारकांना कमी धान्य देऊन त्यातूनच वसूल केली जात असल्याचे समजते.

एकच व्यक्ती चार दुकाने कशी सांभाळततो?
डहाणू तालुक्यात पात्रता नसताना एका स्वस्त धान्य दुकानदारांच्या तीन मुलींना वेगवेगळ्या पदावरून नियुक्ती देऊन त्यांची जी सोय केली आहे, त्याबाबत पुरवठा अधिकारी मात्र काही बोलायला तयार नाहीच. तसेच स्वस्त धान्य दुकानदारांच्या अन्य समस्या हा विभाग सोडवायला तयार नाही. डहाणू तालुक्यातील पुरवठा विभागात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार सुरू असून परस्परांना सांभाळून घेण्याचे काम चालू आहे. स्वस्त धान्य दुकानांसाठीची काही नियम ठरलेले आहेत. धान्य उचल केल्यानंतर महिन्यातून ३० दिवस स्वस्त धान्य दुकान सुरू ठेवणे बंधनकारक आहे. त्यासाठी सकाळी नऊ ते संध्याकाळी सहाची वेळ ठरली आहे; परंतु अनेक स्वस्त धान्य दुकाने बंद असतात. त्यामुळे नागरिकांना वारंवार चकरा घालावा लागतात. त्यांना स्वस्त धान्य दुकानातून धान्य मिळत नाही.पॉस मशीनवर फक्त नोंदी करून हे धान्य परस्पर काळाबाजार विकले जात असल्याच्या तक्रारी आहेत?. त्याशिवाय एका स्वस्त धान्य दुकानदाराकडे चार-चार दुकाने देऊन पुरवठा विभागाने कमालच केली आहे. एकच स्वस्त धान्य दुकानदार चार-चार दुकाने कशी सांभाळू शकतो; शिवाय त्याने अन्य दुकानावर कुणाची नियुक्ती केली असल्यास त्याचे करारनामे केले आहेत का, पुरवठा विभागाला त्याची माहिती दिली आहे का असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत.

वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मौन
स्वस्त धान्य दुकानातील या गैरप्रकाराबाबत आणि पुरवठा शाखेतील घोटाळ्याबाबत तहसीलदार, प्रांताधिकारी आणि जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी चौकशी करायला हवी; परंतु ही चौकशी होत नाही. स्वस्त धान्य दुकाने शहरी आणि ग्रामीण भागात कोणत्या विभागाशी जोडावीत, याबाबत नियमावली आहे; परंतु तीही धाब्यावर बसवून शहरी भागातील दुकाने ग्रामीण भागाला जोडून कार्डधारकांची गैरसोय केली आहे. दरम्यान, पुरवठा विभागातील एका अधिकाऱ्याने अशी चूक आपल्या अगोदरच्या अधिकाऱ्याच्या काळात झाली असल्याचे सांगितले. चौकशी करून चूक दुरुस्त करू, असे या अधिकाऱ्याने सांगितले आहे ‘लक्षवेधी’ने याबाबत आवाज उठवल्याने आता स्वस्त धान्य दुकानदार आणि पुरवठा विभागात चलबिचल सुरू झाली असून सर्वांचे धाबे दणाणले आहेत.

banner 468x60

banner 468x60

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!