महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) सुमारे 86 हजार कर्मचाऱ्यांसाठी महायुती सरकारने ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच एसटी कर्मचाऱ्यांनाही महागाई भत्ता, घरभाडे भत्ता आणि वार्षिक वेतनवाढीत वाढ मंजूर करण्यात आली आहे, अशी घोषणा परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी आज विधिमंडळात केली.
महागाई भत्ता 53 टक्क्यांवरून 58 टक्के
विधानसभा आणि विधानपरिषदेत निवेदन करताना मंत्री सरनाईक म्हणाले की, दि . 22 जून रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सुचनेनुसार एसटीच्या सर्व कामगार संघटनांची बैठक घेतली होती. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने कर्मचाऱ्यांच्या भावना आणि न्याय्य अपेक्षांचा आदर करून हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यानुसार महागाई भत्ता 53 टक्क्यांवरून 58 टक्के, घरभाडे भत्ता 8-16-24 टक्क्यांवरून 10-20-30 टक्के आणि वार्षिक वेतनवाढीचा दर 2 टक्क्यांवरून 3 टक्के करण्यात आला आहे.
या निर्णयामुळे एसटी महामंडळावर दरमहा सुमारे 45 कोटी रुपयांचा अतिरिक्त आर्थिक भार पडणार असला, तरी कर्मचाऱ्यांचे मनोबल उंचावणे आणि त्यांच्या न्याय्य हक्कांना मान्यता देणे अधिक महत्त्वाचे असल्याचे सरनाईक यांनी स्पष्ट केले. तसेच महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, वार्षिक वेतनवाढीची थकबाकी आणि इतर वैधानिक देणी मिळून सुमारे 5,649 कोटी रुपयांची देयके अदा करण्यासाठी शासन भविष्यात आवश्यक ते प्रयत्न करेल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
या निर्णयानंतर 29 जून रोजी प्रस्तावित धरणे आंदोलन मागे घेण्याचा निर्णय कर्मचाऱ्यांनी घेतला असून, हा शासन आणि कर्मचाऱ्यांमधील परस्पर विश्वासाचा विजय असल्याचे सरनाईक यांनी सांगितले.


















zzlWzi8qqy8Un4Ec/s320/1001506655.jpg