banner 728x90

शेअरिंग रिक्षाचे प्रवासी भाडे वाढणार? प्रति किमी दोन रुपये भाडेवाढीची रिक्षा संघटनांची मागणी

banner 468x60

Share This:

गेल्याकाही दिवसांपासून पेट्रोल, डिझेलसह तेलाच्या दरवाढीमुळे जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढले असतानाच, शेअर रिक्षा चालकांनी देखील प्रवासी भाडेवाढीचा प्रस्ताव ठेवला आहे. ठाणे शहरातील रिक्षा-टॅक्सी कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी बैठक घेऊन प्रति किमी किमान दोन रुपये भाडेवाढीबाबत मागणी केली आहे.

यासंदर्भाचे पत्र प्रादेशिक परिवहन विभागाकडे दिले जाणार आहे. ही मागणी मान्य झाल्यास सर्वसामान्य नागरिकांचा प्रवास महागण्याची शक्यता आहे.

ठाणे शहरात वागळे इस्टेट, घोडबंदर भागात मोठ्याप्रमाणात लघु उद्योग आणि आयटी कंपन्या आहेत. त्यामुळे डोंबिवली, कल्याण, अंबरनाथ, बदलापूर, कर्जत, कसारा भागातील लाखो नोकरदार कामानिमित्ताने ठाणे शहरात येतात. तसेच ठाणे शहरातील विविध भागातून ठाणे रेल्वे स्थानक आणि परिसरात वाहतूक करणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. लोकसंख्येच्या तुलनेत ठाणे महापालिका परिवहन सेवेची वाहतूक व्यवस्था अपुरी असल्याने नागरिकांना शेअर रिक्षाने स्थानक किंवा शहरातील इतर भागात जावे लागते.

गेल्याकाही दिवसांपासून जीवनावश्यक वस्तूंची दरवाढ झाली आहे. ठाण्यात सीएनजी गॅस आधारित रिक्षा असल्या तरी दरवाढीच्या झळा रिक्षा चालकांना बसत आहे. सध्या शाळेला सुट्टी असल्याने अनेकजण गावी निघून गेले आहेत. पुरेसे प्रवासी मिळत नसल्याने रिक्षा चालकांच्या उत्पन्नावरही परिणाम होत आहे. या सर्व परिस्थितीचा विचार करुन काही दिवसांपूर्वीच ठाणे शहर रिक्षा टॅक्सी समन्वय कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीनंतर त्यांनी ठाणे प्रादेशिक परिवहन विभागासोबत चर्चा केली. बुधवारी शेअर रिक्षाच्या दरामध्ये वाढ करण्याची मागणी परिवहन विभागाला पत्राद्वारे केली जाणार आहे. यामध्ये प्रतिकिमी दोन रुपयांची दरवाढ करावी अशी मागणी आहे. प्रतिकिमी प्रवासी भाडे दरवाढ झाल्यास त्याचा परिणाम सर्वसामान्य प्रवाशांना सहन करावा लागण्याची शक्यता आहे.

शेअर रिक्षाचे प्रवासी भाडे प्रति किमी किमान दोन रुपये करावे अशी मागणी आम्ही प्रादेशिक परिवहन विभागाकडे केली आहे. महागाईमुळे हा निर्णय घेतला आहे. – विनायक सुर्वे, अध्यक्ष, ठाणे शहर रिक्षा टॅक्सी समन्वय कृती समिती.

banner 468x60

banner 468x60

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!