राज्यात संपूर्ण जुलै महिन्यानंतर आता ऑगस्ट महिन्यातही पाऊस कायम असल्याचे पाहायला मिळत आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्राचा घाटमाथा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून या भागात ‘यलो अलर्ट’जारी करण्यात आला आहे.
नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सातारा, रायगड, पुणे आणि कोल्हापूर घाटमाथ्यावर जोरदार पाऊस होईल. भंडारा, गोदिंया, वर्धा, अकोला, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस होईल. आज मुंबईमध्येही पावसाचा इशारा देण्यात आला असून पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला. मराठवाड्यातील काही भागात जोरदार पाऊस हजेरी लावेल.
पुणे, सातारा व कोल्हापूर घाटमाथ्यावरून प्रवास करताना धुकं आणि दरडी कोसळण्याचा धोका लक्षात घेऊन सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तर पश्चिम विदर्भातील अमरावती, यवतमाळ, वाशिम, बुलढाणा, अकोला या पाचही जिल्ह्यांत मागील 2 दिवसांत तब्बल 45 तालुक्यांत अतिवृष्टीची नोंद झाली आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सध्या हवामानात मोठे बदल झाले आहेत. नैर्ऋत्य राजस्थान परिसरावर कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय असून, त्याला लागून ५.८ किमी उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली आहे. कमी दाबाचा पट्टा ओराई, सिधी, दाल्तोंगज, बंकुरा ते मणिपूरपर्यंत पसरला आहे.
दक्षिण गुजरातपासून उत्तर केरळपर्यंत किनारपट्टीला समांतर हवेचा कमी दाबाचा पट्टा कायम आहे. उत्तर कर्नाटकपासून तमिळनाडूपर्यंतही कमी दाबाची रेषा सक्रिय आहे. हवामान विभागाने 22 राज्यांमध्ये तीव्र वादळाचा इशारा दिला आहे. ताशी 30 ते 70 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता असून यादरम्यान जोरदार पाऊस कोसळण्याचा अंदाज आहे.
देशातील विविध राज्यात पावसाने जनजीवन विस्काळीत झाले. गुजरात आणि आसाममध्ये परिस्थिती अत्यंत गंभीर असून पुरातून लोकांना वाचवण्यासाठी लष्कराची मदत घ्यावी लागत आहे.
















zzlWzi8qqy8Un4Ec/s320/1001506655.jpg