पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या निकषात बदल केले जातील, असे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सोमवारी (ता. ८) सांगितले.
राज्याच्या अनेक भागामध्ये मॉन्सूनपूर्व पावसामुळे पिकांची हानी झाली आहे. इंदापूर, बारामती भागातील नुकसानग्रस्त शेतीला भेट दिल्यानंतर माध्यमांशी बोलताना भरणे यांनी निकषात बदल होणार असल्याचे संकेत दिले.
भरणे म्हणाले, ”कर्जमाफीच्या योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी येत्या दहा दिवसांत सुरू होईल. राज्याच्या साखर कारखान्यांमध्ये हंगामी कामगारांची संख्या मोठी आहे. त्यांना केवळ तीन महिने पगार मिळतो. त्यांना कर्जमाफी योजनेचा लाभ मिळाला पाहिजे.
कर्जमाफी योजनेबाबत शेतकऱ्यांकडून येणाऱ्या सूचना विचारात घेतल्या जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, ”शेतकरी हितासाठी आवश्यक ते सर्व काही करण्याची तयारी सरकारची आहे. मूळात आमचे सरकार शेतकऱ्यांचे आहे. त्यामुळे शेतकरी वर्गातून येणाऱ्या सूचना विचारात घेतल्या जातील. आवश्यक त्या ठिकाणी योजनेत बदलदेखील करण्यात येतील.
शेतकऱ्यांसाठी उत्पादन वाढ, बाजारभाव चांगले मिळण्यासाठी योग्य ते धोरणात्मक निर्णय घेण्याची भूमिका सरकारची आहे. सरसकट कर्जमाफीची शेतकऱ्यांमधून होणारी मागणी चुकीची नाही. मात्र, सरकार हादेखील एक प्रपंच असतो. सर्वांचा विचार करुन निर्णय घ्यावा लागतो. सध्याच्या कर्जमाफीची रक्कम खूप मोठी आहे. अर्थात, कर्जमाफी हा उपाय नाही. शेतकऱ्यांचे एकूण उत्पन्न सुधारण्यासाठी उपयुक्त तंत्रज्ञान व सुविधा पुरवण्यासाठी सरकारचा प्रयत्न सुरू आहे.”
शेतकरी कर्जमाफी जाचक अटींबाबत आमदार रोहित पवार यांनी दिलेल्या आंदोलनाच्या इशाऱ्याबद्दल छेडले असता भरणे म्हणाले, ”मी कोणावरही टीका करणार नाही. मात्र, मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी शेतकरी कर्जमाफीचा चांगला निर्णय घेतला आहे. त्यामुळेच ५६ लाख शेतकऱ्यांना ३६ हजार ५५५ कोटी रुपयांची कर्जमाफी दिली जाणार आहे. कर्जमाफीच्या निकषांबाबत सरकार लवचिक आहे. निकषात बदल करीत जास्तीत जास्त शेतकऱ्यांना लाभ देण्याकडे सरकारचा कल राहील.”
उपाययोजनांना प्राधान्य
कृषिमंत्री भरणे म्हणाले, ”राज्यावर एल निनोचे संकट असून यंदा कमी पावसाचा अंदाज आहे. त्यामुळे राज्य सरकार पाण्याच्या नियोजनासह जलसंधारणाच्या कार्यक्रमांवरदेखील भर देते आहे. दुष्काळास सहनशील बियाण्यांचे वाटप, शेततळ्यांची निर्मिती तसेच इतर उपाययोजनांना प्राधान्य दिले जात आहे. कमी पावसाच्या अंदाजामुळे शेतकऱ्यांनी पेरण्यांची घाई करू नये. १५ जूनपर्यंत पावसाची स्थिती अभ्यासून पेरण्यांचे नियोजन करावे.”
पावसाचा अंदाज घेत पेरण्या करा
राज्यातील एक लाख एकरहून अधिक क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त भागांचे पंचनामे सुरू असून सर्व अहवाल प्राप्त होताच १० दिवसांच्या आत मदत केली जाईल, असेही कृषिमंत्री भरणे म्हणाले.

















zzlWzi8qqy8Un4Ec/s320/1001506655.jpg