आंतरराष्ट्रीय स्तरावर निर्माण झालेल्या तणावाच्या परिस्थितीमुळे गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये चढ-उतार पाहायला मिळत आहेत.
या पार्श्वभूमीवर राज्यात इंधनटंचाई निर्माण होण्याच्या अफवा पसरवल्या जात आहेत. मात्र आता याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी राज्यातील जनतेला महत्त्वाचं आवाहन केलं आहे.
मुख्यमंत्री फडणवीस काय म्हणाले?
मराठवाड्यामध्ये पेट्रोल डिझेलचा तुटवडा जाणवत असल्यासंदर्भात फडणवीसांना मुंबईमध्ये पत्रकारांकडून प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना, “यासंदर्भात सगळ्या जिल्हाधिकारी यांना सूचना दिल्या आहेत. शेतीसाठी डिझेलचा वापर होतोय. तसे आदेश दिले आहे. नीट प्लानिंगसाठी सूचना करण्यात आल्या आहेत,” असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. तसेच, “साठेबाजी करु नका,” असं आवाहनही फडणवीसांनी केलं आहे. आवश्यकतेनुसार डिझेल देण्याचे नियोजन केले गेले आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. सर्वदूर तणावाची परिस्थिती नाही असंही फडणवीस यांनी आवर्जून नमूद केलं.
छगन भुजबळांचं राज्यातील जनतेला आवाहन
फडणवीसांबरोबरच महाराष्ट्रात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याची माहिती, राज्याचे नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनीही दिली. मुंबईमध्ये माध्यमांशी संवाद साधताना भुजबळ म्हणाले की, राज्यात कोणत्याही प्रकारची इंधन टंचाई नाही. त्यामुळे नागरिकांनी भीतीपोटी अतिरिक्त पेट्रोल-डिझेल खरेदी करून साठवणूक करू नये. गेल्या काही दिवसांत अनेक ठिकाणी गरजेपेक्षा अधिक इंधन खरेदी होत असल्याचे निदर्शनास आले असून, त्यामुळे मे महिन्यात नेहमीच्या तुलनेत सुमारे 20 टक्के अधिक पेट्रोल-डिझेलची विक्री झाल्याची माहिती भुजबळांनी दिली.
अतिरिक्त साठा करण्याची आवश्यकता नाही
“देशाचे पंतप्रधान, केंद्र सरकार आणि राज्य सरकार प्रत्येक नागरिकाला पुरेशा प्रमाणात इंधन उपलब्ध करून देण्यास सक्षम आहेत. त्यामुळे अफवा किंवा भीतीच्या वातावरणामुळे अतिरिक्त साठा करण्याची आवश्यकता नाही,” असे आवाहन छगन भुजबळ यांनी केले. यावेळी त्यांनी राज्यातील विविध जिल्ह्यांमधील गेल्या काही दिवसांतील इंधन विक्रीची आकडेवारीही माध्यमांसमोर मांडली. नागरिकांनी संयम बाळगून आवश्यकतेनुसारच इंधन खरेदी करावे आणि प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले.
केंद्र सरकारला पत्र
राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनीही पत्रकारांशी संवाद साधताना केंद्र सरकारला डिझेलवरील जीएसटीमध्ये सवलत देण्यासाठी केंद्र सरकारला पत्र लिहिल्याची माहिती दिली. एसटी महामंडळाच्या खर्चाबद्दल बोलताना सरनाईक यांनी, “प्रति लिटर 4 रुपयापेक्षा जास्त डिझेल दरवाढ झाली आहे. 155 कोटींचे नुकसान होतं आहे. मंगळवारी जीएसटीसंदर्भात आम्ही पत्र दिलं आहे. राजस्थानला जशी सवलत दिली आहे तसं आम्हालाही द्यावं. भाडेवाढ करणं हा मूळ उद्देश नाही मात्र एसटी जिवंत ठेवण्यासाठी हा कटू निर्णय घ्यावा लागू शकतो. युद्धाचा पार्श्वभूमीवर काय पुढे होतं हे पाहणं महत्वाचं आहे,” असं म्हटलं आहे.
काळाबाजार होण्याची भीती
तसेच पुढे बोलताना, “शेतकरी पेट्रोल डिझेलसाठी लाईनमध्ये उभे आहेत अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. मात्र मुख्यमंत्री आणि भुजबळ साहेबांनी आवाहन केलं आहे. अनेक शेतकरी डिझेल मिळणार नाही म्हणून याचा करून ठेवत आहेत.डिझेल, पेट्रोलचा तुटवडा नाही. काही लोक साठा करून काळाबाजार करण्याची शक्यता आहे,” असं सरनाईक म्हणाले आहेत.

















zzlWzi8qqy8Un4Ec/s320/1001506655.jpg