banner 728x90

प. बंगालमध्ये महापरिवर्तन, प. बंगाल देशाच्या विकासाचे इंजिन बनणार; आता देशाच्या ७८ टक्के भूभागावर भाजपचे शासन – देवेंद्र फडणवीस

banner 468x60

Share This:

ममता बॅनर्जी यांच्या १५ वर्षांच्या कुशासनातून जनतेची सुटका करत भाजपने प. बंगालमध्ये केवळ परिवर्तन नव्हे तर महापरिवर्तन घडवून आणले आहे. आता देशाच्या ७८ टक्के भूभागावर भाजप आणि राष्ट्रीय लोकशाह आघाडीचे (एनडीए) शासन असेल.

प. बंगालमध्ये भाजपची दोन तृतीयांश बहुमताकडे वाटचाल सुरू असून येत्या काळात हे राज्य आसामप्रमाणे विकासाचे (ग्रोथ) इंजिन बनेल, अशी अपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प. बंगालमधील सत्तांतरावर प्रतिक्रिया देत व्यक्त केली. पाच पैकी तीन राज्यात भाजपने भगवा फडकावल्याने भाजपच्या प्रदेश कार्यालयात विजयोस्तव साजरा करण्यात आला.

यावेळी प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्यासह ग्रामीण विकास मंत्री जयकुमार गोरे, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे, मुंबईच्या महापौर रितू तावडे, भाजप प्रदेश सरचिटणीस योगेश सागर, सरचिटणीस माधवी नाईक, महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ, प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्र्यांच्या भाषणाचा रोख प. बंगालवर होता. हे राज्य एकेकाळी देशाची आर्थिक, व्यापारी केंद्र होते. परंतु, डाव्या, काँग्रेस आणि तृणमुलच्या राजवटीत राज्याची आर्थिक वाढ खुंटली. परदेशी गुंतवणुकीत हे राज्य सर्वात मागे आहे. ममतांच्या जंगलराज काळात जवळपास सात हजार कंपन्यांनी येथून गुंतवणूक काढून घेतली. परंतु, नरेंद्र मोदी यांनी महामार्ग, रस्ते, मेट्रो आणून राज्याला प्रगतीपथावर आणण्याचा प्रयत्न केला. आता या राज्याचा विकास थांबणार नाही, असा आशावाद फडणवीस यांनी व्यक्त केला.

हा विजय प. बंगालमध्ये निवडणुकांच्या काळात प्राण गमावलेल्या भाजप कार्यकर्त्यांना समर्पित करत मुख्यमंत्री म्हणाले, हा विजय भारताच्या एकतेला, अखंडतेला आणि सार्वभौमत्वाला आव्हान देणाऱ्या घुसखोरांच्या विरोधातील आहे. हा मोदीजींचा करिष्मा आहे. राष्ट्रवादासोबत असलेला प्रत्येक माणूस जिंकला आहे. पक्षाचे चाणक्य केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि पक्षाची नव्याने सूत्रे हाती घेतलेले नितीन नबिन तसेच सर्व भाजप कार्यकर्त्यांनी भारतात होणारी घुसखोरी, दहशत आणि हल्ले यांच्याविरोधात सातत्त्याने लढा देत विजयश्री खेचून आणली.

या निवडणुकीसाठी महाराष्ट्रातून दहा हजार कार्यकर्ते बंगालमध्ये गेले होते. तेथे त्यांनी रात्रीचा दिवस एक केला. स्थानिक कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनीही परिश्रम घेत हा विजय खेचून आणला, अशी प्रतिक्रिया भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी व्यक्त केली.

भाजपच्या कार्यालयात विजयोस्तव

विधानसभा निवडणुकीतील यशाबद्दल भाजप कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी प्रदेश कार्यालयासमोर विजयोत्सव साजरा केला. मोठ्या पडद्यावर निवडणुक निकालाचे थेट प्रक्षेपण करून भाजपची मिनिटामिनिटाला उंचावत जाणारी कामगिरी साजरी केली गेली. पारंपरिक वाद्ये आणून विजयाचा जल्लोष साजरा केला जात होता. महिला कार्यकर्त्यांबरोबरच पक्षाचे नेत्यांनीही ताल धरत आनंद द्विगुणित केला.

झालमुडीचा आस्वाद

प. बंगालमधील प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झालमुडी या स्थानिक खाद्यपदार्थाचा आस्वाद घेतला होता. त्यामुळे हा खाद्यपदार्थ लोकप्रिय झाला. विजय साजरा करण्याकरिता भाजपच्या कार्यालयात झालमुडी विक्रेत्याला पाचारण करण्यात आले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्यासह उपस्थित पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी या खाद्यपदार्थाचा आस्वाद घेतला. त्या आधी एकमेकांना रसगुल्ला भरवत विजय साजरा करण्यात आला.

banner 468x60

banner 468x60

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!