नैऋत्य मोसमी पावसाच्या (मॉन्सून) पुढील वाटचालीस पोषक वातावरण निर्माण झाले असून, येत्या दोन ते तीन दिवसांत मॉन्सून आणखी पुढे सरकण्याची शक्यता आहे. एकीकडे राज्यात पावसाची चाहूल लागली असताना, दुसरीकडे विदर्भात मात्र तीव्र उष्णतेचा तडाखा कायम आहे.
विदर्भातील काही जिल्ह्यांत उष्णतेची लाट येण्याची शक्यता असल्याने या जिल्ह्यांना ‘रेड अलर्ट’ देण्यात आला आहे.
भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार, नैऋत्य व आग्नेय अरबी समुद्राचा काही भाग, पूर्व-मध्य बंगालचा उपसागर आणि अंदमान समुद्राच्या उर्वरित भागात मॉन्सून पुढे सरकण्यासाठी अनुकूल स्थिती आहे. राज्यात बुधवारी (ता. २७) कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे.
पुढील पाच दिवस राज्यातील हवामानात मोठा बदल अपेक्षित नाही. मात्र, विदर्भात उष्णतेची लाट कायम राहील. बुधवारी विदर्भातील अमरावती, वर्धा आणि चंद्रपूर, तर गुरुवारी वर्धा व चंद्रपूर जिल्ह्यांत तीव्र उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना ‘रेड अलर्ट’ देण्यात आला आहे.
अकोला, नागपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांसाठी बुधवारी आणि नागपूर आणि गडचिरोलीसाठी गुरुवारी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तसेच पाच दिवसांनंतर तापमानात ३ ते ४ अंश सेल्सिअसने घट होण्याची शक्यता आहे.


















zzlWzi8qqy8Un4Ec/s320/1001506655.jpg