महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या ऑपरेशन टायगरची चर्चा आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेतील खासदारांचा एक मोठा गट फुटू शकतो असं वारंवार बोललं जातय. काल मंत्री आणि शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी हे कधीतरी घडणारच आहे असं सांगितलं.
“ऑपरेशन टायगर केव्हा, कधी करायचं याची एकनाथ शिंदे साहेबांना कल्पना आहे. ज्या दिवशी गरज भासेल त्या दिवशी एकनाथ शिंदे साहेब ऑपरेशन टायगर यशस्वी करतील. उद्धव ठाकरे गटाचे अनेक आमदार, खासदार आमच्या संपर्कात आहेत. एकदिवस हे घडणारच आहे. उद्धव ठाकरे गटाकडे आता ती ताकद राहिलेला नाही” असं संजय शिरसाट म्हणाले. त्यानंतर काल उद्धव ठाकरे गटात दोन महत्वाच्या राजकीय घडामोडी घडल्या.
परभणीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील 82 पदाधिकाऱ्यांनी आपले सामूहिक राजीनामे पक्षाकडे सोपवले. माजी जिल्हाप्रमुख गंगाप्रसाद आनेराव यांना पदावरून हटवल्याने पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त करत हे राजीनामे दिले. गंगाप्रसाद आनेराव यांच्याजागी विष्णू मुरकुटे यांची परभणी जिल्हा प्रमुखपदी नेमणूक करण्यात आली. या निर्णयावरुन परभणी शिवसेनेत अंतर्गत असंतोष खदखदत आहे. त्याआधी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय दिना पाटील यांनी एकाच गाडीतून प्रवास केला. एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील फोर्टीस रुग्णालयात जाऊन संजय दिना पाटील यांच्या पत्नीच्या तब्येतीची विचारपूस केली. त्यावेळी एकनाथ शिंदे आणि संजय दिना पाटील यांनी एकाच गाडीतून प्रवास केला.
‘कोणासाठी वेळ आणि काळ थांबत नसतो’
आता परभणीतील ठाकरे गटाचे आमदार राहुल पाटील यांच्या वक्तव्यावरुन परभणी शिवसेनेत सर्वकाही आलबेल नसल्याचं स्पष्ट होत आहे. “शिवसेना ही नेते तयार करणारी फॅक्टरी असून, कोणासाठी वेळ आणि काळ थांबत नसतो” असं आमदार राहुल पाटील यांनी वक्तव्य केलं आहे. जिल्ह्यातील 80 पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या राजनाम्या संदर्भात त्यांनी हे वक्तव्य केलं. खासदार संजय जाधव यांच्या समर्थकांनी राजीनामे दिल्यानंतर आमदार राहुल पाटील यांचं हे मोठं विधान आहे.
त्यांना पक्ष टिकवायचा आहे का नाही?
यावरून शिवसेनेतील गटबाजी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. सेनेचे खासदार संजय जाधव हे पक्ष सोडून, शिंदे गटात जाणार असल्याची चर्चा सुरु आहे. मात्र याबाबत अशी कोणतीही चर्चा माझ्या कानावर नाही असं आमदार राहुल पाटील म्हणाले. मात्र यावेळी त्यांनी भाजपावर टीकास्त्र सोडले आहे. “भाजपा किती लोकांना पक्षात घेणार हे समजत नाही, असं म्हणत आता त्यांची गाडी फुल झाली आहे. त्यांना पक्ष टिकवायचा आहे का नाही?. एक दिवस हेच लोक त्यांना खाऊन टाकतील आणि जिथे जास्त लोक होतात तो पक्ष टिकत नाही” असं आमदार राहुल पाटील यांनी म्हटलं आहे.















zzlWzi8qqy8Un4Ec/s320/1001506655.jpg