पालघर-योगेश चांदेकर
शिवसेनेच्या शिंदे गटाला मतदारसंघ न सोडण्याची भूमिका
पालघरः विधान परिषदेच्या १७ जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत महायुतीचे जागा वाटपाचे सूत्र ठरले असले, तरी महायुतीतील तीनही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी दबाव आणून अधिकाधिक जागा पदरात पाडून घेण्यासाठी दबावतंत्र वापरण्यास सुरुवात केली आहे. विशेषतः पुणे, ठाणे-पालघर, नाशिक, अहिल्यानगरमधील जागांसाठी मोठी रस्सीखेच सुरू आहे. पालघरला स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून आतापर्यंत कधीच प्रतिनिधीत्त्व मिळाले नसल्याने तसेच या वेळी भाजपच्या नगरसेवकांची संख्या शिवसेनेपेक्षा तिप्पट असल्याने पालघरच्या कार्यकर्त्याला उमेदवारी मिळावी, असा आग्रह भाजपच्या सर्वंच शाखांनी धरला आहे. तशा भावना पक्षश्रेष्ठींना कळवल्या आहेत.
विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत ठाणे आणि पालघर जिल्ह्यातून एक सदस्य निवडून द्यायचा आहे. या मतदार संघावर यापूर्वी शिंदेसेनेचा वरचष्मा होता; परंतु नुकत्याच झालेल्या निवडणुकीमुळे शिंदेसेनेचे वर्चस्व कमी झाले असून आता भाजप हा पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. पालघर जिल्ह्यात लोकसभा, विधानसभा, महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायतीच्या निवडणुकीत भाजपने आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. महापालिका, नगरपालिका, नगरपंचायती आणि जिल्हा परिषदांचे सदस्य या निवडणुकीत मतदान करीत असतात; परंतु ठाणे आणि पालघर या दोन जिल्हा परिषदांच्या निवडणुका झालेल्या नसल्याने फक्त नगरसेवकच या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
भाजपचा मतदारसंघावर ठाम दावा
ठाणे-पालघर मतदार संघात १,०३० नगरसेवक असून भाजपचे ४४४, तर शिंदेसेनेचे ३२६ नगरसेवक आहेत. युतीत शिंदेसेना ही जागा भाजपला सहजासहजी सोडणार नाही, हे स्पष्ट आहे. पालघर स्थानिक स्वराज्य मतदार संघातून यापूर्वी शिंदेसेनेचे रवींद्र फाटक निवडून आले होते. त्यांचा कार्यकाळ ८ जून २०२२ मध्ये संपुष्टात आला; परंतु त्यानंतर महापालिकांच्या निवडणुका न झाल्याने विधान परिषदेसाठी निवडणूक झाली नव्हती.
सांबरेंच्या शिंदेसेनेला पाठिंब्यानंतरही भाजपचेच पारडे जड
शिंदेसेनेचे ३२६ नगरसेवक असले, तरी जिजाऊ संस्थेचे नीलेश सांबरे यांनी शिंदेसेनेत प्रवेश केल्याने त्यांचे २० नगरसेवक त्यांना मदत करू शकतील. त्यामुळे त्यांची संख्या ३४६ होईल. दुसरीकडे हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीचे ७१ नगरसेवक आहेत. भाजपबरोबर त्यांचे सध्या बिनसले आहे. अर्थात त्यांची मते महाविकास आघाडीला जाण्याची शक्यता कमीच दिसते. भाजपशी जरी जमत नसले, तरी राज्य सरकारशी जुळवून घ्यायची त्यांची मानसिकता लक्षात घेतली, तर त्यांचा पाठिंबा महत्त्वाचा ठरू शकतो. त्यांची मते निर्णायक ठरतील. राष्ट्रवादी (अजित पवार)चे २९ नगरसेवक महायुतीच्या बाजूने असतील.
महाविकास आघाडीकडे फक्त दीडशे नगरसेवक
महाविकास आघाडीला नगरसेवकांची मोठी जुळवाजुळव करावी लागणार आहे. काँग्रेसचे ४७, राष्ट्रवादी (शरद पवार)चे ३८, उद्धवसेनेचे १८, समाजवादी पक्षाचे ६ व इतर काही नगरसेवकांची संख्या १५० पेक्षा अधिक होते. मागील निवडणुकीत काँग्रेसच्या काही नगरसेवकांनी शिंदेसेनेला मदत केली होती. दुसरीकडे छोट्या पक्षांचे नगरसेवक कोणाला मतदान करणार, हे उमेदवार जाहीर झाल्यानंतरच स्पष्ट होईल. मनसे ६, माकप ६, एमआयएम ५, कोणार्क विकास ४, भिवंडी विकास आघाडी ३, वंचित बहुजन आघाडी २, साई पक्ष १ व नऊ अपक्ष नगरसेवक आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत घोडेबाजार होतो. त्यामुळे उमेदवार कोण आणि कोणत्या पक्षाचा यावर विजयाची गणिते ठरणार आहेत.
कोण असतील मतदार?
ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, भिवंडी-निजामपूर, उल्हासनगर, मीरा-भाईंदर, वसई-विरार महापालिका, कुळगाव-बदलापूर, अंबरनाथ, पालघर, डहाणू, जव्हार या नगरपालिका तसेच शहापूर, मुरबाड, वाडा, विक्रमगड, तलासरी, मोखाडा या नगरपंचायतीचे नगरसेवक ठाणे-पालघर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील निवडणुकीसाठी मतदान करतील.
कुणाचा आग्रह?
पालघर शहर भारतीय जनता पक्षाचे खासदार डॉ हेमंत सवरा, आमदार हरिश्चंद्र भोये, वीणा देशमुख, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रकाश निकम, शहराध्यक्ष तथा नगरसेवक जयेश आव्हाड, वाड्याच्या नगराध्यक्षा रीमा गंधे, भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष नंदन वर्तक, सरचिटणीस अशोक वडे तसेच महिला आघाडीच्या विविध पदाधिकाऱ्यांनी माध्यमांशी बोलताना ठाणे-पालघर मतदारसंघासाठी आग्रही का आहे आणि पक्षश्रेष्ठींकडे आम्ही आमच्या भावना व्यक्त केल्याचे सांगून पालघर जिल्ह्यातील कार्यकर्त्याला उमेदवारी मिळावी, अशी मागणी केली आहे.


















zzlWzi8qqy8Un4Ec/s320/1001506655.jpg