पालघर-योगेश चांदेकर
वनविभागाकडून आदिवासींवर अत्याचार
महामार्गालगतच्या जमिनीत व्यवसाय करू देण्यास विरोध
आत्महत्या करण्याचा आदिवासी कुटुंबाचा इशारा
पालघरः पालघर तालुक्यातील कुडे येथील रमेश कृष्णा टोकरे व अजय दुंदाजी टोकरे हे त्यांच्या स्वतःच्या जमिनीत रोपवाटिकेचा व्यवसाय करत असतानाही गावातील काही धनदांडग्या लोकांच्या इशाऱ्यानुसार वनविभाग काम करीत असून ही जमीन बळकवण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत, असा आरोप टोकरे यांनी केला आहे. कुटुंबीयांना रोपवाटिकेचा व्यवसाय करू देण्यास प्रतिबंध केला जात आहे. त्यामुळे आता हे कुटुंब जेरीस आले असून वन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या छळाच्या विरोधात आत्महत्या करण्याचा इशारा या कुटुंबाने दिला आहे. रमेश टोकरे व अजय कोकरे हे कुडे येथे राहतात. त्यांच्या नावावर सर्वे नंबर १२२/५३ चा उतारा आहे. त्यांची ती जमीन वडिलोपार्जित आहे. ही जमीन राष्ट्रीय महामार्गालगत असल्याने या जमिनीला कोट्यवधी रुपयांचा भाव आहे. या जमिनीवर गावातील काही धनदांडग्या पुढाऱ्यांचा डोळा आहे. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना हाताशी धरून त्यांनी ही जमीन बळकावण्याचा प्रयत्न चालवला आहे.
……….
धनदांडग्यांचा जमिनी बळकावण्याचा प्रयत्न
या जमिनीत टोकरे कुटुंबीय रोपवाटिका चालवीत असून रोपांच्या विक्रीतून येणाऱ्या पैशांवर त्यांचा उदरनिर्वाह चालतो; परंतु ही जमीन अनेकांच्या नजरेत असल्याने या जमिनीत त्यांनी काहीच करू नये आणि ही जमीन बळकवावी असा काहींचा प्रयत्न आहे. त्यासाठी कुडे येतील वनविभागाचे अधिकारी त्यांना बोलावून घेऊन या जमिनीतील रोपे उचलून घेऊन जा, येथे काहीच करायचे नाही असे सांगून त्रास देत आहेत.
अधिकारी धनदांडग्यांच्या हातचे बाहुले
आदिवासी असूनही तसेच जमिनीचा उतारा टोकरे यांच्या नावावर असूनही त्यांचे उपजीविकेचे साधनच हिरावून घेण्याचा प्रयत्न अधिकारी करीत आहेत? ते गावातील धंनदांडग्यांच्या हातचे बाहुले बनले आहेत, असा आरोप टोकरे कुटुंबीयांनी केला. पोलिसांना बोलावून खोटे गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिली जात असल्याचाही त्यांचा आरोप आहे. या सगळ्यामुळे टोकरे कुटुंबीयांची मनस्थिती बिघडली असून वनविभागाच्या अधिकाऱ्यांचा हा त्रास थांबला नाही, तर आत्महत्या करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. याबाबत त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाल्याने आता पोलिस प्रशासन आणि महसूल विभागाचे वरिष्ठ अधिकारी काय कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे
‘टोकरे यांच्याकडे कागदपत्रे आहेत. त्यांच्याकडे सात-बारा आहे; परंतु त्यांची जागा नेमकी कोठे आहे. याचा उल्लेख नाही. १२२/५३ सर्वे क्रमांकातील १२२/४० पर्यंत उल्लेख आहे; पुढच्या गटांचा उल्लेख नाही. भूमी अभिलेख विभागाकडून त्याची मोजणी करायला हवी. वनपाल आणि संबंधित शेतकरी या दोघांनाही बोलवून त्यांची चौकशी करू. विभागाचे कुणी अधिकारी त्रास देत असतील, तर त्यांची चौकशी करून अहवाल वरिष्ठांना देऊ.’
–ऋषिकेश वाघ, वनपरिक्षेत्र अधिकारी (दहिसर)
‘टोकरे कुटुंबांची वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडून होणाऱ्या छळाबाबत माझ्याकडे अजून तक्रार आलेली नाही. माझ्याकडे कागदपत्रांसह तक्रार आल्यास त्याची शहानिशा करून चौकशीचे आदेश देईन.’
विवेक पंडित, अध्यक्ष आदिवासी विकास आढावा समिती(राज्यमंत्री दर्जा)


















zzlWzi8qqy8Un4Ec/s320/1001506655.jpg